पुणे : पुढारी वृत्तेसवा : आंबेगाव खुर्द येथील किराणा माल विक्रेत्याने खंडणी न दिल्याने दुकानाची, वाहनांची तोडफोड करून धारदार शस्त्राने वार करत दहशत पसरवणार्या विनोद सोमवंशी व त्याच्या 12 साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का )कायद्यांतर्गत कारवाई केली.
टोळी प्रमुख विनोद बालाजी सोमवंशी (20, रा. जांभूळवाडी, दत्तनगर), टोळी सदस्य आकाश गुलाबराव कांबळे (21, रा. आंबेगाव खुर्द), आदित्य विनोद नाईक (23, रा. हनुमाननगर, आंबेगाव खुर्द), गोविंद बबन लोखंडे (18), भूषण विनोद भांडवलकर (19, दोघे रा. जांभूळवाडी रोड, कात्रज), प्रवीण रामा गुडे (23, रा. कात्रज) आणि अभिषेक देविदास भगुरे (18, रा. कात्रज) यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत.
तर, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांचे इतर तीन साथीदार फरार आहेत. आरोपी विनोद सोमवंशी याने गुन्हेगारांची टोळी तयार करून टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी दरोडा, खंडणी, खुनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत, गंभीर दुखापत करणे, मारामारी, विनापरवाना हत्यार बाळगणे, पिस्टल बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत पसरवणे, असे गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी वारंवार अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी परिमंडळ 2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे सादर केला. या अर्जाची छाननी करून अपर पोलिस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर करीत आहेत.
हेही वाचा