पुणे
Pune News : दिव्यांग अन् विशेष मुलांनी साकारल्या पणत्या-दिवे
पुणे : रंगबिरंगी पणत्या – दिवे, कागदी आकाशकंदील, कलरफुल मेणबत्त्या, उटणे अशा कित्येक वस्तू शारीरिक मर्यादेला बाजूला सारून दिव्यांग आणि विशेष मुलांनी, व्यक्तींनी दिवाळीनिमित्त साकारल्या आहेत. दिवाळी प्रदर्शनात त्यांच्या कलागुणांना पुणेकरांची दादही मिळत आहे. विविध संस्था-कार्यशाळांमधील दिव्यांग, विशेष मुलांनी, व्यक्तींनी नानाविध वस्तू आपल्या कौशल्याने तयार केल्या आहेत. कोणी पणत्यांना रंग देण्याचे काम केले आहे, तर कोणी कागदी कंदील तयार केले आहे आणि प्रत्येकाने मेहनतीने या वस्तू बनविल्या आहेत. 'हम किसीसे कम नहीं' हे त्यांनी दाखवून दिले असून, दिवाळीच्या प्रकाशमयी सणाला त्यांच्यातील कलाकारीला मोकळी वाट मिळाली आहे.
दिवाळीनिमित्त आयोजित प्रदर्शनांमध्ये त्यांनी साकारलेल्या वस्तूंना प्रतिसाद मिळत आहे. विविध शाळा, संस्था आणि उद्योग केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेणार्या मुलांनी, व्यक्तींनी या वस्तू जिद्दीने, आत्मविश्वासाने बनविल्या असून, फक्त वस्तूच नव्हे, तर भाजणीचे पीठ, फराळही त्यांनी तयार केला आहे. सध्या विविध ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन होत आहेत. याविषयी बाल कल्याण संस्थेच्या व्यवस्थापक अपर्णा पानसे म्हणाल्या, दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन संस्थेत 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान आयोजित केले होते.
जवळपास दीड महिन्याच्या मेहनतीतून मुलांनी या वस्तू साकारल्या आणि 12 ते 15 प्रकारच्या पणत्या, की-होल्डर, फ—ेम्स, तोरण, वॉल हँगिंग, कापडी कंदील अशा विविध प्रकारच्या वस्तू मुलांनी तयार केल्या. संस्थेत येणार्या विविध शाळा आणि कार्यशाळांमधील दिव्यांग मुलांनी वस्तू तयार करण्यात उत्साहाने सहभाग घेतला.
कामायनी प्रशिक्षण आणि संशोधन सोसायटी संचालित कामायनी उद्योग केंद्राचे व्यवस्थापक विजय टोपे म्हणाले, संस्थेतील दिव्यांग आणि विशेष मुलांनी, व्यक्तींनी विविध वस्तू तयार केल्या आहेत, त्यात मेणबत्त्या, पणत्या, रांगोळीचे रंग, उटणे, कंदील अशा वस्तूंचा समावेश आहे. प्रत्येकाने या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. 7 आणि 8 ऑक्टोबरदरम्यान वस्तूंचे प्रदर्शन गोखलेनगर येथील कामायनी संस्थेतील मुनोत सभागृहात सकाळी अकरा ते सायंकाळी सात यावेळेत आयोजित केले आहे.
दिवाळीनिमित्त मी आकाशकंदील साकारले. खूप छान वाटले. मला चित्रकलेची आवड असल्याने कंदील बनवताना खूप आनंद झाला.आनंदी, विशेष मुलगी
हेही वाचा

