

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील सत्र पूर्तता संपलेल्या अंतिम पूर्व व अंतिम विषयात अनुत्तीर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे या संदर्भातील परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे 88 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.विद्यापीठातर्फे सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांचे पीआरएन नंबर ब्लॉक करण्यात आले होते.
त्यामुळे अनेक विद्यार्थी पदवीपासून वंचित राहणार असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करीत यूजीसीकडे पाठपुरावा केला. त्यानंतर 1 नोव्हेंबरला परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, नेमक्या कोणत्या वर्षापासूनच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध असेल, याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, आता विद्यापीठाने अंतिम पूर्व व अंतिम वर्षाचे सर्व विषय सुटू शकतील, अशा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध केली आहे.
विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार, अंतिम वर्ष अनुत्तीर्ण असलेले परीक्षा विषयक व अभ्यासक्रम विषयक नियमांनुसार पात्र असलेले विद्यार्थी या दोन परीक्षा देऊ शकतात. तसेच अंतिम पूर्व वर्षातील अनुत्तीर्ण असलेले परीक्षा विषयक व अभ्यासक्रम विषयक नियमानुसार पात्र असलेले विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात बॅकलॉग आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचा अंतिम पूर्व वर्षातील बॅकलॉग सुटू शकतो, असे सर्व विद्यार्थी विद्यापीठाकडून दिल्या जाणार्या परीक्षेच्या दोन संधींना पात्र आहेत.
मौखिक, प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट, डेझरटेशन या व इतर अनुषंगिक परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण असणारे विद्यार्थी परीक्षा विषयक व अभ्यासक्रम विषयक नियमानुसार पात्र असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. तसेच, अंतिम व अंतिम पूर्व वर्षाच्या परीक्षेमध्ये न येणार्या विद्यार्थ्यांनासुद्धा विशेष बाब म्हणून परीक्षेची संधी मिळू शकते. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने महाविद्यालयाकडे अर्ज करणे अपेक्षित आहे. एक वर्ष संधीसाठी पात्र असणार्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्राचार्यांनी प्रचलित आदेशानुसार विविध केंद्रीय व राज्यस्तरीय प्राधिकरणाचे निकष, परीक्षा विषयक व अभ्यासक्रम विषयक मार्गदर्शक तत्त्वे व अटी या सर्वांची खातरजमा करून पात्र विद्यार्थ्यांच्या विनंतीबाबत स्पष्ट अभिप्राय व विद्यार्थ्यांचे अर्ज परीक्षा विभागाकडे सादर करावेत.
विशेष सवलत दिलेल्या विद्यार्थ्यांना नियमित परीक्षांमध्ये सामावून घेणे शक्य असल्यास ते समक्ष विषयानुसार परीक्षा देतील, अन्यथा अशा विद्यार्थ्यांची परीक्षा स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल. पात्र विद्यार्थ्यांना दोन परीक्षांची विशेष संधी मिळाल्यानंतरच्या काळात यापैकी कोणत्याही विद्यार्थ्यास व अशा इतर विद्यार्थ्यांना भविष्यकाळात संधी दिली जाणार नाही, असेदेखील विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा