paneer : पनीरचे अतिसेवन हानिकारकच! | पुढारी

paneer : पनीरचे अतिसेवन हानिकारकच!

नवी दिल्ली : पनीर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हल्ली पनीरचा वापर असलेल्या अनेक पंजाबी रेसिपी आपल्याकडेही लोकप्रिय झाल्या आहेत आणि घरोघरी असे पदार्थ केले जात असतात. पनीर हे चवीला आणि आरोग्यालाही चांगले असले तरी ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हे लक्षात ठेवले पाहिजे. पनीरचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते, असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे.

जर आपल्याला आपले हृदय तंदुरुस्त ठेवायचे असेल आणि कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित करायचे असेल तर पनीरचे सेवन कमी करणे हितावह ठरते. पनीरचे जास्त सेवन केल्याने शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते. सोबतच हृदयरोग होऊ शकतो. पनीरमध्ये मीठ असल्यामुळे त्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. परिणामी, पनीर जास्त प्रमाणात घेतल्यास उच्च रक्तदाब होऊ शकतो.

ज्यांना उच्च रक्तदाब समस्या आहे त्यांनी पनीर खाणे टाळावे. ज्यांना अ‍ॅसिडीटीचा त्रास आहे, त्यांनी कमीत कमी पनीर खावे. खायचे असेल तर ते रात्री खाऊ नये. अन्यथा, आम्लपित्त आणि पोट बिघडण्याची समस्या होऊ शकते. पनीर प्रोटिनचा चांगला स्रोत मानला जातो. परंतु, शरीरात जास्त प्रमाणात प्रोटिनमुळे अतिसार होऊ शकतो. कच्चे पनीर खाणे देखील बर्‍याच लोकांना आवडते. परंतु, ही चांगली सवय नाही. असे पनीर खाल्ल्याने संसर्ग होऊ शकतो.

Back to top button