पिंपरी चिंचवड महापालिकेचे वराती मागून घोडे !

पिंपरी चिंचवड महापालिकेचे वराती मागून घोडे !
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून शहरातील उत्तम स्थितीतील रस्ते तोडून त्या ठिकाणी अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार चकचकीत रस्ते तयार केले. या डिझाईननुसार रस्ते अरुंद आणि पदपथ रुंद व प्रशस्त करण्यात आले; मात्र पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे; तसेच वाहनेही उभी केली जातात. त्यामुळे पादचार्‍यांना नाईलाजास्तव रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यातच रस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी कोंडीत भर पडत आहे. या संदर्भात वाहनचालकांसह नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर आता रस्ता सुरक्षित कसा करता येईल, यासाठी सल्लागार नेमला जाणार आहे. महापालिका प्रशासनाच्या या 'वराती मागून घोडे' प्रकारावरून नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या :

सुुस्थितील रस्ते उखडून अर्बन स्ट्रीट डिझाईन
शहरात सर्व भागात प्रशस्त रस्ते निर्माण करण्यात आले. तसेच, अनेक उड्डाणपुल उभारण्यात आले आहेत. पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमधील रस्ते प्रशस्त असल्याने कौतुक केले जाते. मात्र, परदेशातील प्रगत शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार विकसित करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले. आकुर्डी, पिंपळे निलख, वाकड, रावेत, चिंचवड, भोसरी, वाकड येथील रस्त्यांवर हा प्रयोग राबविण्यात आला. त्यानंतर शहरातील सर्व भागांत चांगले रस्ते उखडून या प्रकारचे रस्ते व पदपथ विकसित करण्यात येत आहेत.

प्रशासनाचे पदपथांवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष
स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नवी सांगवी या भागांत असे रस्ते तयार करण्यात आले आहे.त्यात रस्ते अरूंद होऊन पदपथ रूंद झाले. लाल रंगाचे पट्टे मारून सायकल ट्रॅकही बनविण्यात आले. पदपथावर अतिक्रमण होणार नाही, अशी ग्वाही महापालिकेने दिली होती. मात्र, त्यानुसार कारवाई न झाल्याने, प्रशस्त पदपथाच्या प्रशस्त जागेवर दुकानदार व विक्रेत्यांनी व्यवसाय थाटला आहे. काही वाहनचालक पदपथावर बेशिस्तपणे वाहने लावतात. पदपथ रिकामे नसल्याने पादचार्‍यांना रस्त्यांवरून ये-जा करावी लागत आहे. एकसलग असा सुरक्षित मार्ग नसल्याने सायकलस्वारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा प्रकार निव्वळ उधळपट्टीसाठी होत असल्याचे आरोप विरोधकांनी अनेकदा केला आहे. प्रशासनाने टीकेची दखल न घेता अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार रस्ते निर्माण करण्याचा सपाटा कायम ठेवला आहे.

याबाबत ओरड सुरू झाल्याने आता हेच रस्ते सुरक्षित करण्यासाठी चौक व काही रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्त करण्यात येणार आहे. ती एजन्सी सर्वेक्षण करून उपाययोजना सुचविणार आहे. त्यानुसार महापालिका पुन्हा काम करणार असून, त्या करीता कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे.

पार्किंगबाबत स्पष्ट धोरण नाही
शहरात पुरेशा संख्येने पार्किग झोन निर्माण करण्यात महापालिकेस अपयश आले आहे. तसेच, स्मार्ट सिटी कंपनी आणि महामेट्रोनही पार्किंग तयार केलेले नाहीत. त्यामुळे अनेक वाहने सर्रासपणे रस्त्यांवरच उभी केली जातात. महापालिकेने शहरात पे अ‍ॅण्ड पार्क सुरू केले होते. मात्र, स्वतंत्र वाहनतळ नसल्याने त्याला वाहनचालकांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच, वाहतुक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर सातत्याने कारवाई होत नाही, आदी कारणांमुळे ती योजना गुंडाळण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. परिणामी, पदपथावर सर्रासपणे वाहने लावण्याचे प्रकार वाढले आहेत.

आता, अर्बन स्ट्रीट स्केप डिझाईनवर खर्च
अर्बन स्ट्रीट डिजाईनने रस्ते व पदपथ विकसित केल्यानंतर आता, तेथे सुशोभीकरण केले जाणार आहे. अर्बन स्ट्रीट स्केप डिजाईननुसार हे काम केले जाणार आहे. त्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते निवडण्यात आले आहे. दापोडी ते निगडी रस्त्यांसाठी तब्बल 170 कोटी रूपये रूपये खर्च केले जाणार आहेत. त्यात पदपथ आकर्षकरित्या सुशोभीत करण्यात येत असून, विशिष्ट रचनेचे बाके लावण्यात येणार आहेत. झाड्यांवर विद्युत प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे. काही ठिकाणी आकर्षक चित्रे लावण्यात येणार आहेत. यासंदर्भात 31 ऑगस्टला कार्यशाळाही घेण्यात आली.

जुन्या दळणवळण सुविधेत बदल करणार
शहरातील जुन्या झालेल्या वाहतुकीच्या दळणवळणामध्ये काही बदल करावे लागणार आहेत. महापालिका शहरातील रहदारी कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजना राबवित असताना नागरिकांचा प्रतिसादात महत्वाचा आहे. हरित सेतू हा महापालिकेचा एक अनोखा प्रकल्प आहे. पदपथ व सायकल ट्रॅक उद्यानांना जोडण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीयस्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पदपथावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण पथकाकडून नियमितपणे कारवाई केली जात आहे, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वेक्षण
वाहने किती रस्ता वापरतात, तितकाच रस्ता ठेवून उर्वरित जागेत सायकल ट्रॅक व पदपथ उभारण्यात येत आहेत. अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार केलेल्या रस्त्यांमुळे पादचारी व सायकलस्वारांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होत आहे. त्यामुळे पायी चालणार्या व सायकल चालविणार्या नागरिकांची संख्या वाढत आहे. मात्र, शहरातील काही चौकांत वारंवार वाहतुक कोंडी होत आहे. ती कोंडी सुडविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news