नगर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी शाळेत सापडल्या 14 कुणबी नोंदी

नगर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी शाळेत सापडल्या 14 कुणबी नोंदी
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शासनाच्या सूचनांनुसार नगर जिल्ह्यात कुणबी दस्तावेज तपासणी कक्ष तसेच जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. काल रविवारी सुटी असतानादेखील समितीचे सदस्य तथा 'प्राथमिक'चे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व 'माध्यमिक'चे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सारोळा-कासार येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन 1967 पूर्वीच्या कुणबी उल्लेख असल्याच्या नोंदी शोधण्याचे काम केले. या वेळी 1910 मधील 14 कुणबी नोंदी आढळल्या आहेत. राज्यातील मराठा समाजाला कुणबीचे सरसकट दाखले मिळावेत, या मागणीसाठी मोठे जनआंदोलन पुकारले गेले.

संबंधित बातम्या :

शासनाने या मागणीची दखल घेताना 'कुणबी' दस्तावेज शोधण्यावर भर दिला आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र कक्षाची निर्मिती करणे व जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. यातील शालेय दस्तावेज तपासणीसाठी शिक्षणाधिकारी अशोक कडूस व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात चार दिवसांचा मायक्रो प्लॅन तयार केला आहे.

रविवारी सारोळा कासार येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय दप्तरात जुन्या नोंदींची तपासणी केली. यावेळी गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव, सरपंच आरती कडूस, रवींद्र कडूस, केंद्रप्रमुख सुभाष काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ऐश्वर्य मैड, मुख्याध्यापक वैजनाथ धामणे, बाबासाहेब धामणे आदी उपस्थित होते. या ठिकाणी 1910 मधील 14 कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत.

सीईओंच्या मार्गदर्शनात 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सारोळे कासार शाळेत आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी 1910 च्या दरम्यानच्या तत्कालीन 14 विद्यार्थ्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. आपल्या सर्व शाळांकडे जुने रेकॉर्ड आहे. येत्या तीन-चार दिवसांत शाळानिहाय अशी पडताळणी केली जाईल. केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापकांना त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे.
                                                – अशोक कडूस, शिक्षणाधिकारी माध्यमिक

सारोळा कासारचा ब्रिटिशकालीन सर्व्हे काय सांगतो
अहमदनगर शहरापासून दक्षिणेला 20 कि.मी. अंतरावर सारोळा कासार हे गाव आहे. या गावाचा एक सर्व्हे ब्रिटिश सरकारच्या काळात 1928-29 मध्ये झाला होता. त्या सर्व्हेवर आधारित 'सारोळा कासार स्टडी ऑफ अ डेक्कन व्हिलेज इन द फेमिन झोन' हे 500 पानी इंग्रजी पुस्तक 1938मध्ये तत्कालीन कलेक्टर ए. एम. मॅकमिलन यांनी प्रकाशित केले होते. तत्कालीन बॉम्बे गव्हर्नरच्या आदेशाने तत्कालीन मामलेदार एल. बी. जगलपुरे व सारोळा कासारचे भूमिपुत्र असलेले सब रजिस्ट्रार के. डी. काळे यांनी हा सर्व्हे केला होता. त्या पुस्तकात पान नंबर 379 वर मराठ्यांचा उल्लेख कुणबी असा केलेला आहे. कुणबी हा शब्द या प्रदेशात इतर जाती किंवा वर्गाच्या शेती करणार्‍यांना लागू होत नाही. असाही स्पष्ट उल्लेख या पुस्तकात आहे. सदर पुस्तक भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.

शालेय सर्वसाधारण नोंदवहीची पडताळणी सुरू
1967 पूर्वीच्या कुणबीच्या नोंदी तपासणीसाठी शिक्षण विभाग तत्परतेने काम करत आहेत. शिक्षणाधिकारी कडूस, पाटील यांच्या सूचनांनुसार प्रत्येक केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि त्या-त्या शाळांचे मुख्याध्यापक यांनी त्यांच्या शाळांचे जुने रेकॉर्ड पाहून तशा कुणबी नोंदी शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना आवश्यक ते मार्गदर्शनही करण्यात आले आहे. मोडी लिपीने नोंद असेल तर जाणकार टीम पडताळणी करणार आहे. प्रत्येक शाळेकडे रेकॉर्ड असल्याने तीन-चार दिवसांत शोधमोहीम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news