Gram Panchayat Election : बारामतीत अजित पवारांच्या पॅनलला भाजपचे आव्हान; कोण मारणार बाजी? | पुढारी

Gram Panchayat Election : बारामतीत अजित पवारांच्या पॅनलला भाजपचे आव्हान; कोण मारणार बाजी?

भवानीनगर (ता. बारामती) पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीविरुद्ध भाजप या दोन पॅनेलमध्ये चुरशीची लढत होत असल्याने रविवारी (दि. 5) होणार्‍या मतदानाकडे त्यामुळेच लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबरोबर जुळवून घेतले असले तरी त्यांच्याच गावातील काटेवाडी गावात भाजपच्या पदाधिकार्‍यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनेलशी जुळवून घेतलेले नाही.

गावपातळीवर मात्र राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू आहे. या निवडणुकीत काटेवाडी गावात भाजपचे कडवे आव्हान असल्यामुळे अजित पवार यांना गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करता आलेली नाही. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पांडुरंग कचरे यांनी राष्ट्रवादीच्या श्री जय भवानी माता पॅनेलच्या विरोधात बहुजन ग्रामविकास पॅनेल उभा करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनेलला आव्हान दिले आहे.

निवडणूक 15 जागांसाठी होत असून सरपंच पदासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीच्या श्री जय भवानी माता पॅनेल व भारतीय जनता पार्टीच्या बहुजन ग्रामविकास पॅनेल या दोन प्रमुख पॅनलबरोबरच अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काटेवाडी गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होत असल्यामुळे कोणत्या पॅनेलला किती यश मिळते याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

सरपंच-उपसरपंचांवरील अविश्वास ठरावासाठी दोनतृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे : उच्च न्यायालय

केंद्रीय पर्यटन मंत्र्यांसमोर 1,300 कोटींच्या प्रस्तावांचे सादरीकरण

विदेश धोरण : कतारचा मृत्युदंड; भारतापुढचे पर्याय

Back to top button