केंद्रीय पर्यटन मंत्र्यांसमोर 1,300 कोटींच्या प्रस्तावांचे सादरीकरण

केंद्रीय पर्यटन मंत्र्यांसमोर 1,300 कोटींच्या प्रस्तावांचे सादरीकरण
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर पर्यटनाच्या द़ृष्टीने समृद्ध जिल्हा आहे. पर्यटन विकासाची प्रचंड क्षमता आहे. हा विकास यापूर्वीच व्हायला हवा होता, आता तो होईलच. हवा तितका निधी दिला जाईल. त्याकरिता तातडीने प्रस्ताव सादर करा, अशा सूचना केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन विकासाच्या 900 कोटी तसेच अन्य सुमारे 400 कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांचे नाईक यांच्यासमोर सादरीकरण झाले. यावेळी पर्यटनातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री नाईक म्हणाले, जिल्ह्यात पर्यटनासाठी पोषक वातावरण आहे. येथील अनेक ठिकाणांचे ऐतिहासिक महत्त्व आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा दुरुस्ती, जतन व संवर्धनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करा, असे सांगून मी गोव्याचा असल्यामुळे कोल्हापूरशी माझी जवळीकता असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

केंद्राकडे असलेल्या व पुरातत्त्व विभागाकडून संवर्धन होत असलेल्या या ठिकाणांचा संवर्धन आराखडा तयार केल्याचे सांगून मंत्री मुश्रीफ म्हणाले, पुरातत्त्व विभागाकडून यासाठी वास्तुविशारद यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते म्हणाले, पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक हे गोवा येथील असल्यामुळे त्यांची कोल्हापूरशी नाळ जुळलेली आहे. पर्यटन विकासासाठी ते निश्चितच निधी देतील. जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असून, त्यांच्या विकासासाठी निधीची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आवश्यक निधी मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा. हा निधी मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

मुश्रीफ म्हणाले, जोतिबा मंदिर डोंगर ते पन्हाळा किल्ला यादरम्यान प्रस्तावित रोप वेचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करा. तसेच किल्ल्याचा विकास आराखडा करताना किल्ल्यांच्या आजूबाजूच्या परिसराचाही विकास होईल, याकडे लक्ष द्यावे. पन्हाळा ते विशाळगडदरम्यान ट्रेकिंग मार्गावर आवश्यक त्या सोयी-सुविधा व दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांची माहिती देऊन राज्य शासनाकडे पाठविण्यात येत असलेल्या व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व दुरुस्तीसाठी 13.52 कोटी रुपयांना तांत्रिक मंजुरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, असे त्यांनी सांगितले.

अंबाबाई मंदिर, श्री जोतिबा मंदिर तसेच रांगणा, पन्हाळा, विशाळगड व पारगड किल्ला या ठिकाणांचे जतन, संवर्धन, दुरुस्ती व परिसर विकासासाठी कामे केली जाणार आहेत. यासह जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण त्या त्या विभागप्रमुखांनी केले.

मंत्री नाईक यांनी जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासोबत दुपारी अंबाबाई मंदिर परिसर, जुना राजवाडा याठिकाणी पाहणी केली. बैठकीला आ. प्रकाश आवाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, माजी आ. अमल महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटगे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहने, कार्यकारी अभियंता आयरेकर, पुरातत्त्व विभागाच्या वास्तुविशारद कासार पाटील (नाशिक), अंजली कलमदानी (पुणे), आभा लांबा (मुंबई), पूनम ठाकूर (मुंबई) तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news