पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात जवळपास दोन हजार अधिकृत होर्डिंग असताना चालू वर्षी केवळ 245 होर्डिंगचेच नूतनीकरण करून घेण्यात आले आहे. उर्वरित होर्डिंगचे सात दिवसात नूतनीकरण न केल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने दिला आहे. महापालिका परिसरात जाहिरात करण्यासाठी महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून सशुल्क परवानगी घ्यावी लागते. जाहिरात करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग उभे करण्यात आले आहेत.
हे हेर्डिंगही महापालिकेच्या परवानगीनेच उभे करावे लागतात. त्यासाठी नियमावलीचे पालन करावे लागते. शहरात 1826 अधिकृत हेर्डिंग आहेत. तर तेवढेच अनधिकृत हेर्डिंग आहेत. अनधिकृत हेर्डिंगवर महापालिकेकडीन कारवाई केली जाते. तर अधिकृत हेर्डिंगचे दरवर्षी नूतनीकरण करून घ्यावे लागते. तसेच हेर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे लागते.
चालू आर्थिक वर्षासाठी महापालिकेने हेर्डिंगचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. मात्र, शहरातील 1826 अधिकृत हेर्डिंगपैकी आतापर्यंत केवळ 245 हेर्डिंगच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर परवाना व आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी शुक्रवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांची बैठक घेऊन सात दिवसात ज्या हेर्डिंगच्या परवान्याचे नूतनीकरण होणार नाही, त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा