Pimpri News : पिंपळे गुरव येथे मैलामिश्रित पाणी रस्त्यावर | पुढारी

Pimpri News : पिंपळे गुरव येथे मैलामिश्रित पाणी रस्त्यावर

नवी सांगवी : पुढारी वृत्तसेवा : पिंपळे गुरव येथील ऋतुजा कॉलनी आणि सिंहगड कॉलनीमध्ये वारंवार ड्रेनेजलाइन तुंबल्याने चेंबरमधून मैलामिश्रित दूषित पाणी रस्त्याने वाहत आहे. शुक्रवारी सकाळी येथील अंतर्गत रस्त्यावर अक्षरशः मैलामिश्रित पाणी वाहून जात होते. याकडे महापालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या मल:निस्सारण विभागाने येथील ड्रेनेजलाइन नवीन टाकावी, अशी मागणी येथील परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सिंहगड कॉलनी आणि ऋतुजा कॉलनी हा पिंपळे गुरवमधील महत्त्वाचा सर्वात मोठा रहिवासी भाग आहे. या रहिवासी भागात वारंवार ड्रेनेजलाईन तुंबत आहे. त्यामुळे येथे नवीन ड्रेनेजलाईन टाकण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारींना महापालिका अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत. वारंवार ड्रेनेजलाईन तुंबून मैलायुक्त पाणी रस्त्यावर येते. कधी कधी नागरिकांच्या उंबर्‍यापर्यंत येऊन घरात जाते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथील परिसरातील रिंगरोड गेलेल्या जागांवर महापालिका नवीन इमारतींना परवानगी देऊन ड्रेनेजलाईनलाही अंतर्गत जोडण्या देेते.

रिंगरोडच्या जागेवर इमारतींना परवानगी

या ठिकाणाहून नियोजित रिंगरोड गेला आहे. नवीन ड्रेनेजलाइन टाकता येणार नाही, असे उत्तर अधिकार्‍यांकडून मिळते. मात्र, ज्या परिसरातून रिंगरोड गेलेला आहे, त्या परिसरात रहिवासी इमारतींना महापालिका परवानगी देत आहे. तसेच अगोदरच क्षमता पूर्ण झालेल्या जुन्या ड्रेनेजलाईनला इमारतीची अंतर्गत जोडणी दिली जात आहे. परिणामी जुन्या ड्रेनेजलाईनवर ताण येत आहे. त्यामुळे ही ड्रेनेजलाईन वारंवार तुंबत आहे. असे असतानाही नवीन ड्रेनेजलाईन टाकण्यास महापालिका टाळाटाळ करीत आहे, अशी दुटप्पी भूमिका पालिकेकडून का घेतली जात आहे, असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.

गेल्याच आठवड्यात ड्रेनेजलाईन तुंबून रस्त्यावर मैलामिश्रित पाणी वाहून येण्याचा प्रकार घडला. त्यामुळे दिवसभर दुर्गंधीचा सामना येथील नागरिकांना करावा लागला आहे. याच परिसरात मध्यवर्ती ठिकाणी लहान मुलांची नर्सरी शाळा आहे. त्यामुळे पालक विद्यार्थी ये-जा करीत असताना अक्षरशः तोंडावर रुमाल धरून जात आहेत. आणखी किती दिवस असा त्रास सहन करावा लागणार आहे, हे एकदा प्रशासनाने सांगून टाकावे.

तानाजी जवळकर, स्थानिक रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा

Anemia : राज्यात ६३ हजार मुले अॅनिमियाग्रस्त; २ कोटी २५ लाखांहून अधिक मुलांची तपासणी

Pimpri News : क्षयरोग कंत्राटी अधिकारी-कर्मचार्‍यांचा संप

Maratha Reservation : पात्र मराठ्यांनाच मिळणार कुणबी प्रमाणपत्र; सरकारचा नवा जीआर जरांगे-पाटील यांनी स्वीकारला

Back to top button