दुष्काळी आदेशाची अंमलबजावणी करा ; शासनाचे निर्देश | पुढारी

दुष्काळी आदेशाची अंमलबजावणी करा ; शासनाचे निर्देश

खोर : पुढारी वृत्तसेवा :  राज्य शासनाने राज्यातील 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले असून, त्यात दौंड तालुका मध्यम स्वरूपाचा दुष्काळी असल्याचा समावेश केला आहे. त्यामुळे दौंड तालुक्याला शासनाने जाहीर केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश तालुका प्रशासन विभागाला दिले आहेत. यंदा दौंड तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, जिरेगाव, कौठडी आदी गावांतील तलाव कोरडे पडले आहेत. तर, विहिरींमधील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्यासाठी वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना वणवण भटकंंती करण्याची वेळ आली आहे. तर, पाळीव जनावरांचा चारा व पाणीप्रश्न तितकाच गंभीर बनत चालला आहे.

संबंधित बातम्या :

पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर या तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ म्हणून जाहीर केला आहे. तर, दौंड, शिरूर व इंदापूर हे तीन तालुके मध्यम स्वरूपाचा दुष्काळ म्हणून घोषित केली गेले आहेत. शासनाने दौंड तालुक्याला मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केल्याने जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात 33.50 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी निर्णय, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर, शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदींचा लाभ दौंड तालुक्याला मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तरी शासनाने खडकवासला कालाव्यातून पाण्याचे आवर्तन सोडून या दुष्काळी गावांतील तलाव भरावेत. तसेच, तातडीने इतर आवश्यक उपाययोजना अमलात आणाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दौंड तालुक्यात जून ते सप्टेंबर महिन्याची पावसाची सरासरी 358.6 मिलिमीटर आहे. मात्र, प्रत्यक्षात 286.8 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. सध्या पाणीसाठा संपुष्टात आला असल्याने टंचाई निर्माण होऊ लागली आहे.
                                                    – राहुल माने, कृषी अधिकारी, दौंड

 

 

Back to top button