Pune news : सिंहगड भागात बिबट्याची दहशत कायम | पुढारी

Pune news : सिंहगड भागात बिबट्याची दहशत कायम

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगडावर पर्यटकांची वर्दळ वाढली असताना किल्ल्याच्या परिसरात बिबट्यांची दहशत कायम आहे. दोन आठवड्यांपूर्वी गडाच्या घाटरस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर गडाच्या पायथ्याच्या मणेरवाडी, थोपटेवाडी येथील खासगी फार्म हाऊसमध्ये बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडल्याने वन विभाग सतर्क झाला आहे.

खानापूर, खामगाव मावळ, घेरा सिंहगड परिसरात सध्या पिकांच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सायंकाळी उशिरापर्यंत शेतात काम करत आहेत. पर्यटक तसेच स्थानिक शेतकर्‍यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने जंगल परिसरात रात्रीची गस्त सुरू केली आहे.
सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील म्हणाले की, फार्म हाऊसमध्ये दोन कुत्र्यांचा बिबट्या सदृश हिंस्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

मात्र, या परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले नाहीत. गवत झुडपे असल्याने ठसे दिसत नाहीत. असे असले तरी सिंहगड परिसरात मादीसह चार ते पाच बिबट्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे खबरदारीसाठी जनजागृती केली जात आहे. शेतकर्‍यांनी सायंकाळनंतर दूर अंतरावरील शेतात जाऊ नये. तसेच सायंकाळनंतर गडावर व परिसरातील वनक्षेत्रात पर्यटकांनी थांबू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. सिंहगड घाटरस्ता व परिसरात वन विभागाने खबरदारीचे फलकही लावले आहेत.

हेही वाचा

अंजिराच्या खट्ट्या बहाराला पाण्याचे वेध

सांगली : जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, अन्यथा लोकप्रतिनिधींच्या दारात आंदोलन

Nashik News : जायकवाडीला पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Back to top button