Pimpri News : पालिकेत शासनाचे अधिकारी झाले उदंड | पुढारी

Pimpri News : पालिकेत शासनाचे अधिकारी झाले उदंड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नव्या आकृतीबंधात शासनाकडून प्रतिनियुक्तीवर 5 उपायुक्त आणि 7 सहायक आयुक्त नियुक्त करणे अपेक्षित आहे. मात्र, उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्या जागेवर शासनाचे अधिकारी रूजू होत आहेत. महापालिकेतील स्थानिक अधिकार्‍यांच्या जागेवरही राज्य शासनाने अधिकारी नियुक्त केल्याने कामकाज वाटपावरूनही अधिकार्‍यांमध्ये खटके उडत आहेत. त्यावरून खासगीत संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अहमदनगरचे जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाने यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वी प्रतिनियुक्तीवरील सहायक आयुक्तांची संख्या वाढलेली असताना आता भदाने यांच्या नियुक्तीने शासनाच्या उपायुक्तांची संख्यादेखील वाढली आहे. महापालिका आस्थापनेवर एकूण उपायुक्त 10 आणि 14 सहायक आयुक्त ही पदे मंजूर आहेत. अर्ध्या पदांवर शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी येतात. तर, अर्धी पदे महापालिका अधिकार्‍यांना पदोन्नती देऊन भरली जातात. त्यामुळे महापालिकेत शासनाचे 5 उपायुक्त आणि 7 सहायक आयुक्त प्रतिनियुक्तीवरील नियुक्त करण्याचा नियम आहे. परंतु, प्रशासकीय राजवटीत शासनाच्या अधिकार्‍यांची महापालिकेतील संख्या वाढत
चालली आहे.

  • उपायुक्तांमध्ये शासनाचे सुभाष इंगळे, अजय चारठाणकर, विठ्ठल जोशी, रविकिरण घोडके, मिनीनाथ दंडवते हे 5 अधिकारी असताना भदाने यांच्यामुळे एका अतिरिक्त उपायुक्तांची भर पडली. तर, महापालिका आस्थापनेवरील अधिकार्‍यांसाठी 5 जागा मंजूर असताना सद्यस्थितीत केवळ मनोज लोणकर व संदीप खोत हे दोनच उपायुक्त आहेत. दुसरीकडे प्रतिनियुक्तीवरील सहायक आयुक्तांसाठी 7 पदे आहेत. परंतु, सद्यस्थितीत नीलेश देशमुख, विनोद जळक, विजयकुमार थोरात, विजयकुमार सरनाईक, यशवंत डांगे, उमेश ढाकणे, सुषमा शिंदे व अविनाश शिंदे हे 8 जण रूजू झाले आहेत.
  • शासनाकडून मर्यादेपेक्षा अधिक संख्येने अधिकारी महापालिकेत रूजू झाल्यामुळे कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. कोणत्या अधिकार्‍यांना कोणते विभाग दिले जातात, यावरून नाराजी व्यक्त केली जाते. ठराविक अधिकार्‍यांना मलईदार विभाग दिले जात असल्याने इतर अधिकारी रोष व्यक्त करीत आहेत. या असमान नियुक्त्या आणि विभाग वाटपाबाबत खासगी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

Lalit drug racket case : ललितच्या पलायनाला महिना; ससूनमधील दोषी मोकाटच

Dattu Bhokanal : नौकानयन स्पर्धेत दत्तू भोकनळची रौप्यकमाई

Pimpri News : पीएमआरडीएचा रिंगरस्ता रडतखडत

Back to top button