पुणे : मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून, काही ठिकाणी एसटी बसवर दगडफेक आणि जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाजीनगर बसस्थानकातून मराठवाड्यात जाणार्या सुमारे 300 बस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना गावी जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. त्यामुळे आंदोलकांनी काही ठिकाणी एसटीच्या बसवर दगडफेक करून जाळपोळ केली आहे. मराठवाड्यात बीड, लातूर जिल्ह्यात आंदोलक आक्रमक झाले आहेत. पुणे-वाकडेवाडी बसस्थानकावरून मराठवाड्यातील अनेक भागांत जाणार्या आणि येणार्या एसटी बस रद्द केल्या आहेत.
मराठवाड्यात जाणारी बससेवा मंगळवारी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नाशिककडे जाणारी बससेवा दुपारपर्यंत बंद होती. मात्र, त्यानंतर ती सुरुळीत सुरू करण्यात आली. ज्या प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले आहे, त्यांना पैसे परत दिले जातात, असे पुणे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे यांनी सांगितले.
हेही वाचा