बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली | पुढारी

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या येथील सहयोग सोसायटी या निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात आगडोंब उसळला असल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. सोमवारी (दि. ३०) बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले होते. याशिवाय बस स्थानकावर थांबलेल्या बसवर असलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरलाही काळे फासले गेले. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या :
दरम्यान मराठा आंदोलक लोकप्रतिनिधींबाबत आता उघडपणे भूमिका घेवू लागले आहेत. राज्यात ठिकठिकाणी त्याचा प्रत्यय येतो आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही सध्या बारामतीत नाही. ते सध्या मुंबईत आहेत. परंतु कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढवत खबरदारी घेण्यात आली आहे.
गोविंदबागेला नेहमीचीच सुरक्षा
दरम्यान बारामती-निरा रस्त्यावर माळेगाव नगरपंचायतीच्या हद्दीत  ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे गोविंदबाग हे निवासस्थान आहे. तेथे मात्र नेहमीचीच सुरक्षा आहे. अधिकचा बंदोबस्त तेथे तैनात करण्यात आलेला नाही.

Back to top button