बारामतीमध्ये आता पोस्टर लावण्याचा नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही घेतला धसका | पुढारी

बारामतीमध्ये आता पोस्टर लावण्याचा नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही घेतला धसका

बारामती : पुढारी वृत्तसेवा : आरक्षणासाठी मराठा समाज बारामती तालुक्यात कमालीचा आक्रमक होऊन पेटला आहे. साखळी उपोषणे गावागावांत सुरू आहेत. तरीही सरकार ढिम्म असल्याने मराठा तरुण कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातूनच वडगावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरवरील फोटोला काळे फासले गेले. अन्य गावांतही अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. परंतु सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनीही पोस्टरबाजी करताना आता सावधानता बाळगणे गरजेचे झाले आहे. मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणार्‍या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला बारामतीत मोठा प्रतिसाद मिळाला होता.

संबंधित बातम्या :

तेव्हापासून वातावरण अधिकच तंग होऊ लागले आहे. विविध गावांनी सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदी केली आहे. नेत्यांविरोधात समाजाचा रोष वाढत चालला आहे. त्यात सर्वच पक्षांच्या नेत्यांविषयी आता समाज उघडपणे नाराजी व्यक्त करू लागला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारकडून सोडवला जात नाही. उलट, वेळ मागून घेत चालढकल करण्याचाच प्रयत्न सरकार करत असल्याची समाजातील तरुण-तरुणींची भावना झाली आहे. दुसरीकडे ऐपत नसताना मुला-मुलींना शिकवले, परंतु आरक्षणाअभावी आता नोकरी मिळत नसल्याने पालकही चिंतेत आहेत. त्यातून समाजाचा सर्व स्तर आंदोलनात सहभागी होतो आहे. आंदोलनाचे स्वरूप अधिक व्यापक होत चालले आहे.

संबंधित बातम्या

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यांनाही मराठा समाजाने माळेगाव कारखान्यात गळीत हंगाम शुभारंभाला येऊ दिले नाही. तत्पूर्वी पणदरे व सोमेश्वरच्या सभेत मराठा तरुणांनी पवार यांच्याकडे आरक्षणाची मागणी केली होती. पवार यांच्यासमोर तालुक्यात यापूर्वी असे प्रकार अपवादानेच घडले असतील. आता समाज ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, त्यामुळे रोष व्यक्त करतो आहे. पवार यांनी यापूर्वीच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु ते देताना अन्य कोणाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. तरीही सोमवारी त्यांच्या फोटोला काळे फासले गेले.

Back to top button