

देहूगाव ; पुढारी वृत्तसेवा : देहू, सांगुर्डी फाटा, सांगुर्डी आणि विठ्ठलनगर ते कॅटबरीपर्यंतच्या रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले मोठंमोठे खड्डे आणि चिखल यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.
पावसाळ्यात तर रस्त्यावर चिखल की चिखलात रस्ता, असा प्रश्न चालकांना पडत आहे. देहू सांगुर्डी फाटा ते सांगुर्डी, तोलानी शिक्षण संस्था कान्हेवाडी, कॅटबरी मार्गे इंदोरीला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याकडे आतापर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर पडलेले मोठंमोठे खड्डे, चिखलाचे तयार झालेले उंचवटे यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे चालकांना मणक्याच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चालक त्रस्त झाले आहेत.
तसेच, चिखलाचे थर निर्माण होत असल्यामुळे रस्त्यावर उंचवटे तयार झाले आहेत. खड्ड्यांत वाहने आदळल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
देहूगाव, येलवाडी फाटा, सांगुर्डी गाव ते विठ्ठलनगर हा किमान दीड ते दोन किलोमीटरचा रस्ता आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या तर विठ्ठलनगर ते कॅडबरीमार्गे इंदोरी हा रस्ता आमदार सुनील शेळके यांच्या अखत्यारीत येतो. विठ्ठलनगर ते देहूगाव फाट्यापर्यंत असलेल्या डांबरी रस्त्यावरील ठिकठिकाणी खडी उखडल्याने मोठंमोठे खड्डे पडले आहेत. तर, काही ठिकाणी रस्ताच राहिला नाही. विठ्ठलनगर ते कॅडबरी हा रस्ता कच्चा आहे. पावसाळा आला की मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते; परंतु अशा मुरमामुळे पुन्हा खड्डे पडत आहेत.
हेही वाचा