सरकारने काही केलं नाही, असे म्हणता येणार नाही : शंभूराज देसाई | पुढारी

सरकारने काही केलं नाही, असे म्हणता येणार नाही : शंभूराज देसाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेताना आरक्षण देण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. या काळात सरकारने काहीही केलं नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. सरकराने मराठा आरक्षणासाठी समिती गठीत करून त्यांना लागणारी सर्व यंत्रणा उभी केली आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका आहे, अशी माहिती उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होेते.

जरांगे पाटील यांनी दुसर्‍यांदा उपोषण सुरू केले आहे. मात्र, सरकारकडून चर्चेला कोणी आले नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यावर देसाई यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, एक नाही तर 100 वेळा जाऊन त्यांची भेट घेऊ. पाटील यांनी उपोषण सुरू केले, त्या वेळीच मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. मात्र, त्या वेळी जरांगे पाटील यांनी आमच्या गावात कुणीही पुढारी येऊ नका, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यास कोणीच गेले नाही. आता मनोज जरांगे पाटील म्हणत असतील तर सरकार नक्कीच चर्चेला तयार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. परंतु सध्या तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे तेलंगणा सरकारकडून मराठा समाजातील नोंदींसंदर्भातील कागदपत्रे मिळण्यास अडचण येत आहे. तरी यासंदर्भात लवकरच तोडगा निघेल. मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी अद्यापपर्यंत 23 बैठका घेतल्या आहेत. सोमवारी पुन्हा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आहे. आम्ही मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

Back to top button