

नानगाव; पुढारी वृत्तसेवा : दौंंड व शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या भीमा व मुळा-मुठा नदीपात्रातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याने नदीपात्र कोरडे पडू लागले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दौंडच्या जिरायती भागाप्रमाणेच बागायती भागालादेखील लवकरच दुष्काळाच्या झळा बसणार आहेत. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील डोंगर भागात व धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस खाली वाहणार्या भीमा व मुळा-मुठा नद्यांची पाणीपातळी खालावल्याची वस्तुस्थिती आहे.
मात्र, यंदाच्या वर्षी पाऊस खूपच कमी झाल्याने ऐन पावसाळ्यात नदीतील पाण्याची पातळी खालावल्याचे बघावयास मिळाले. त्यानंतर गणेशोत्सव काळात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी बळीराजा आनंदी झाला होता. मात्र, या पावसाचादेखील जोर कमी झाला आणि पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्याने येणार्या काळात शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याची चिंता शेतकर्यांना सतावू लागली.
दरम्यान, नदीपात्रातील पाण्याची पातळी सध्या झपाट्याने खालावत चालल्याने ज्या भागात नदीपात्र उथळ आहे, त्या ठिकाणी नदीपात्र कोरडे पडले आहे. तेथे शेतकरी आता विद्युत मोटारींची पाइप नदीपात्रात वाढविताना दिसत आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा आहे, त्या ठिकाणी जास्त विद्युत मोटारी असल्याने पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असून, अशा ठिकाणीदेखील पाणीपातळीत मोठी घट होताना दिसून येत आहे. बागायती भागात मोठ्या प्रमाणावर ऊसशेती, पालेभाज्या, फळभाज्या, जानावरांचा चारा, अशी वेगवेगळी पिके असतात. त्यामुळे ही पिके जगवायची कशी? असा प्रश्न आता शेतकर्यांपुढे सध्या उभा राहिला आहे.
सध्या भीमा नदीतील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने येणार्या काळात पिके कशी जगवायची? हा आमच्यापुढे उभा असलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. यामुळे ऊसपिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
पांडुरंग ताकवणे, शेतकरी
पाणीपातळी खाली जात असून, नदीच्या उथळ भागातील शेतकर्यांना आत्ताच पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. अशा भागांत लवकर नदीपात्र कोरडेठाक पडणार असल्याने शेतीपिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.
सारंग ताकवणे, शेतकरी
हेही वाचा