Pune News : सीएनजी पंपाशेजारी फटाका स्टॉल | पुढारी

Pune News : सीएनजी पंपाशेजारी फटाका स्टॉल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : धनकवडी येथील सीएनजी पंपाच्याजवळ असलेल्या महापालिकेच्या जागेवर चार फटाका स्टॉल उभारण्याची परवानगी देण्यात यावी तसेच हे स्टॉल लिलाव पद्धतीने न देता थेट द्यावेत, यासाठी महापालिका अधिकार्‍यांवर राजकीय पदाधिकार्‍यांकडून दबाव टाकला जात आहे. दरम्यान, येथील प्रक्रिया ऑनलाइन करू नये, यासाठी धडपडणार्‍या महापालिकेच्या एका कर्मचार्‍याला अतिरिक्त आयुक्तांनी चांगलेच झापल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात ज्या ठिकाणी फटाका स्टॉलला परवानगी दिलेली आहे, त्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत धनकवडी येथील केके मार्केटजवळील जागेचा समावेश नाही. फटका स्टॉल ज्वलनशील वस्तूंचा साठा असलेल्या परिसरात लावल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने महापालिका त्यासाठी अग्निशामक दल तसेच सुरक्षेबाबत पोलिसांची ‘एनओसी’ घेते. तसेच अशा जागांच्या ठिकाणी परवानगी देत नाही.

असे असताना काही राजकीय पदाधिकार्‍यांकडून सीएनजी पंपजवळच्या परिसरातच लिलाव न घेता फटाके स्टॉल उभारण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. महापालिकेने केवळ परवानगी द्यावी. एनओसी आणि इतर पूर्तता संबंधित व्यावसायिक करून देतील, असे सांगत दबाव टाकला जात आहे.

हेही वाचा

रेल्वे स्थानकातून सुरू झाला ‘त्‍या’ बाळाच्या आयुष्याचा प्रवास!

Pune News : रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग : अर्चना पांडे

senior citizens : ज्येष्ठांसाठी पुण्याजवळ मोफत पर्यटन केंद्र

Back to top button