चिकन, मटणाला मागणी वाढली | पुढारी

चिकन, मटणाला मागणी वाढली

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  दसरा संपल्याने, थंडी पडण्यास सुरुवात झाल्याने आणि ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे चिकन व मटणाला मागणी वाढली आहे. सध्या ब्रॉयलर कोंबडीचे चिकन 180 ते 200 रुपये, तर मटणाची प्रतिकिलो 660 ते 700 रुपये दराने विक्री होत आहे. तसेच अंड्यांचे भावदेखील वाढले असून, प्रतिअंडे 7 रुपयेप्रमाणे विक्री होत आहे, अशी माहिती आंबेगाव तालुक्यातील चिकन व्यावसायिकांनी दिली. श्रावण महिना, पितृ पंधरवडा, गणेशोत्सव त्यानंतर नवरात्रोत्सवात बहुतांशी अनेकजण मांसाहार टाळतात. गेली दोन महिने मांसाहार वर्ज्य असल्यामुळे मटण, चिकन दुकानांत शुकशुकाट जाणवत होता. मात्र, आता सणासुदीचे दिवस संपले असून, नुकतीच थंडी पडू लागली आहे. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराळा सुरू झाला आहे.

त्यामुळे मटण, चिकन आणि अंड्यांवर मांसाहार शौकिनांनी ताव मारण्यास सुरुवात केली आहे. दसर्‍यादिवशी सकाळी पूजापाठ झाल्यानंतर मांसाहार शौकिनांनी मांसाहार करण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती घोडेगाव येथील ब्रॉयलर कोंबडीचे होलसेल विक्रेते व भारत चिकनचे जावेद मिस्त्री, फिरोज मिस्त्री आणि कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकन अँड एग्ज सेंटरचे विक्रेते इसाक शेख यांनी दिली. ढाबे मटण, चिकन दुकानांत ग्राहकांची वर्दळ सुरू झाली आहे, असे कळंब येथील हॉटेल व्यावसायिक नितीन भालेराव, संतोष डोके यांनी सांगितले. 15 दिवसांपूर्वी चिकनचे दर 130 ते 150 रुपये किलो होते. सध्या ब—ॉयलर कोंबडीचे 180 ते 200 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. मटणाच्या बाजारभावातसुद्धा प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मेंढीचे व बोकडाचे मटण प्रतिकिलो 660 ते 700 रुपये दराने विकले जात आहे, अशी माहिती एकलहरे येथील बकर्‍यांचे व्यापारी व चॉईस मटण शॉपचे मालक शेखर कांबळे यांनी दिली.

हे ही वाचा :

Back to top button