गळीत हंगामाच्या शुभारंभावेळी अजित पवार यांना मोळी टाकू न देण्याचा निर्धार | पुढारी

गळीत हंगामाच्या शुभारंभावेळी अजित पवार यांना मोळी टाकू न देण्याचा निर्धार

सांगवी : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणावर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात बहुतांश ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने शनिवारी (दि. 28) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. याला विरोध करण्यासाठी शेकडो मराठा समाजबांधव सहभागी होणार असल्याचा ठराव सांगवी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सांगवी व कांबळेश्वर गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदीचा ठराव करून तशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

बारामती तालुक्यातील सांगवी येथे बुधवारी (दि. 25) सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला सांगवीसह शिरवली, कांबळेश्वर, शिरष्णे, लाटे व बजरंगवाडी या गावांतील शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार राजकीय नेत्यांना गावबंदी, साखळी उपोषणाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बारामती येथील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठा समाजाच्या मुलांना आरक्षणाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. आरक्षण नसल्याने जादा गुण असूनही नोकर्‍या मिळत नाहीत. बहुतांश तरुणांचे वय उलटून गेल्यानंतरही लग्न जमत नाहीत. अशा एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोणतेही सरकार सत्तेत आल्यावर त्यांना मराठा आरक्षणाचा विसर पडतो. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने मराठा समाजाला चांगला चेहरा मिळाला असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी वरील आंदोलन करण्यात येत असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

 

Back to top button