Pune News : चाळिशीत प्रीती मस्के यांनी जिंकला ‘आयर्नमॅन’ | पुढारी

Pune News : चाळिशीत प्रीती मस्के यांनी जिंकला ‘आयर्नमॅन’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फिटनेससाठी त्यांनी धावणे अन् सायकलिंगला सुरुवात केली आणि बघता बघता ही आवड प्रीती मस्के यांच्यासाठी करिअर बनले. याच करिअरच्या वाटेमुळे प्रीती यांनी वयाच्या चाळीशीत धावणे आणि सायकलिंगमध्ये तब्बल पाच वेळा ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नाव कोरले आहेच…पण, आता तर त्यांनी जागतिक स्तरावरील ‘आयर्नमॅन’चा किताबही जिंकला आहे.

स्पेनमध्ये 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या आयर्नमॅन स्पर्धा फक्त 15 तास 7 मिनिटांत पूर्ण करुन त्यांनी हा किताब जिंकला आहे. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले आहे. गृहिणी, उद्योजिका आणि एक खेळाडू असलेल्या 46 वर्षीय प्रीती यांनी विविध स्पर्धा आपल्या कर्तबगारीने जिंकल्या आहेत. 2018 साली त्यांनी फिटनेससाठी धावणे आणि सायकलिंगला सुरुवात केली आणि त्यांच्यासाठी हे क्षेत्र करिअरचे वाट बनले.

आज संपूर्ण भारतातच नाही तर नेपाळ, भूतान आदी देशांमधून त्यांनी सायकलवरुन भ—मंती केली आहे. तर आयर्नमॅन या जागतिक स्तरावरील स्पर्धेत 3.8 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालविणे आणि 42 किलोमीटर धावणे हे 15 तास 7 मिनिटांत पूर्ण करुन त्यांनी स्पर्धा जिंकली आहे. या यशाच्या निमित्ताने दै. पुढारीने त्यांच्याशी संवाद साधला.
आपल्या कामगिरीबद्दल प्रीती म्हणाल्या, फिटनेससाठी धावणे आणि सायकलिंगला सुरुवात केली. त्यासाठी प्रशिक्षणही घेतले आणि त्यानंतर माझा या क्षेत्रातील प्रवास सुरु झाला.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये पाच वेळा आपले नाव कोरले आहे, याचा अभिमान वाटतो. नुकताच आयर्नमॅन हा किताबही मी जिंकला आहे, ही गोष्ट तर माझ्यासाठी खूप आनंदाची आहे. आतापर्यंतच्या प्रवासात मला माझ्या कुटुंबीयांनी खूप साथ दिली. फक्त सायकलिंगच नव्हे तर मी आपल्या प्रत्येक रेकॉर्डमधून अवयवदानासाठी जनजागृती करत आहे. येत्या काळात पुणे ते सिंगापूर पल्ला सायकलने गाठण्याचा आणि अल्ट्रामॅन स्पर्धा जिंकण्यासाठी तयारी करत आहे.

असा राहिला सायकल प्रवास

  •  जून 2022 मध्ये मनाली ते लेह हा प्रवास सायकलिंग करून 55 तास 7 मिनिटांत
  •  मनाली ते लेह हा प्रवास 4 दिवस 22 तासांत पूर्ण
  •  कोटेश्वर (गुजरात) ते किबिथू (अरुणाचल प्रदेश) हा 3955 किलोमीटरचा प्रवास 13 दिवस 18 मिनिटांत पूर्ण
  •  काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास सायकलिंग करुन 11 दिवसांत पूर्ण
  •  भूतान, नेपाळ आणि भारत या तिन्ही देशांच्या राजधान्यांचा प्रवास सायकलने दहा दिवस 18 तासांत पूर्ण

हेही वाचा

Maratha Reservation : राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी ; आरक्षणासाठी देवळा तालुक्यात लागले बॅनर

दोन हजार वर्षांपूर्वीच्या रोमन सँडलचा शोध

चीनमध्ये एकेकाळी वावरत होते आखूड सोंडेचे टापीर

Back to top button