माद्रिद : रोमन काळातील स्पेनमध्ये हजारो वर्षांपूर्वी एक माणूस विहीर स्वच्छ करण्यासाठी उतरला होता. त्याचे नक्षीदार सँडल या विहिरीत पडले आणि दोन हजार वर्षे तिथेच पडून राहिले. आता पुरातत्त्व संशोधकांनी हे सँडल शोधून काढले आहे.
उत्तर स्पेनमधील 'ल्युकस ऑस्टरम' (सध्याचे ल्युगो डी ल्हानेरा) या रोमन वसाहतीच्या ठिकाणी पुरातत्व संशोधकांनी हे सँडल शोधले. पुले सिस्टीमच्या सहाय्याने हे संशोधक या विहिरीत उतरले होते. या दगडी विहिरीच्या खोलवर भागात जाऊन त्यांनी सुरक्षितपणे हे संशोधन केले. जमीनीच्या पृष्ठभागापासून तीन मीटर खोलीवर चिखलात त्यांना हे प्राचीन सँडल आढळून आले. याबाबतची माहिती स्पेनमधील 'एल पैस' या दैनिकाने दिली आहे. हे सँडल बनवण्यासाठीची कारागिरी पाहून संशोधक थक्क झाले. त्यामध्ये अतिशय बारकाईने नक्षीकाम केले आहे. विशेषतः सँडलच्या सोलवरही असे नक्षीकाम आहे. त्यावर अनेक आकृत्या पाहायला मिळतात. हजारो वर्षे चिखलात पडूनही हे सँडल सुरक्षित राहिलेले आहे.