Pune News : सिंहगडावर बिबट्याची दहशत, पर्यटक मात्र बेफिकीर | पुढारी

Pune News : सिंहगडावर बिबट्याची दहशत, पर्यटक मात्र बेफिकीर

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  सिंहगड किल्ल्याच्या परिसरात बिबट्यांची दहशत कायम आहे. यात एका मादी बिबट्यासह चार ते पाच बिबटे अनेक महिन्यांपासून जंगलात ठाण मांडून आहे. दुसरीकडे सायंकाळनंतर गडावर तसेच परिसरातील वनक्षेत्रात थांबवण्यास प्रतिबंध असताना बेफिकीर पर्यटक रात्री उशिरापर्यंत गडावर थांबत असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. सुटीच्या व इतर दिवशी हजारो पर्यटक सिंहगडावर गर्दी करत आहेत. बिबट्यांचा अधिवास येथील जंगलात आहे.

संबंधित बातम्या :

त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गडाच्या पायथ्याला गोळेवाडी नाक्यावर दोन्ही बाजूला तसेच घाट रस्ता व परिसरात वनविभागाने फलक लावले आहेत. बिबट्याचा वावर वाढल्याने सायंकाळी सहानंतर गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, गडावर तसेच परिसरात पर्यटक उशिरापर्यंत थांबत आहेत. बिबट्याचा वावर असल्याने पर्यटकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील यांनी केले आहे. आवाहन करून तसेच फलक लावूनही बेफिकीर पर्यटक जुमानत नाहीत. सिंहगड किल्ल्याच्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने सायंकाळनंतर पहाटेपर्यंत वनक्षेत्रात जाणे धोक्याचे आहे, असे पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्यासह वनरक्षक बळीराम वाईकर, संदीप कोळी, नितीन गोळे, रमेश खामकर, चव्हाण, पढेर खाटपे यांचे पथक गडाच्या घाट रस्त्यासह परिसरात रात्रीची गस्त घालत आहे.

झुडपे वाढल्याने अधिक धोका
पावसामुळे सिंहगडच्या चोहोबाजूंच्या डोंगररानात गवत, झुडपे वाढली आहेत. जंगल घनदाट आहे. त्यात वास्तव्यास असलेले वन्यप्राणी दाट झुडपे गवतामुळे दिसत नाहीत. घाट रस्ता तसेच अतकरवाडी व कल्याण पायी मार्गाच्या दुतर्फा दाट गवत, झुडपे वाढली आहेत.

घाट रस्त्यावर 24 तास सुरक्षा रक्षक
सूचना देऊनही पर्यटक उशिरापर्यंत गडावर थांबत असल्याने सायंकाळी सातनंतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने गड रिकामा करण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी घाट रस्त्यावर 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. पायी मार्ग व परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

वर्षभरापासून वावर वाढला
बिबट्याची एक मादी गडाच्या घाट रस्त्यावरील कोंढापूर फाटा ओलांडताना सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे दिसत आहे. एका मादीसोबत तीन ते चार बिबटे तसेच बछडे असावेत, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षभरापासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. सिंहगडाच्या डोंगररांगा पानशेतपासून रायगड जिल्ह्याच्या जंगलापर्यंत पसरल्या आहेत. त्यामुळे पुन्हा फिरून बिबटे सिंहगड किल्ल्याच्या परिसरात वास्तव्यास येत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

Back to top button