पुणे : दरोड्याचा थरार ! पती,पत्नीला मारहाण करून 3 लाखांचा ऐवज लुटला | पुढारी

पुणे : दरोड्याचा थरार ! पती,पत्नीला मारहाण करून 3 लाखांचा ऐवज लुटला

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा :  दौंड तालुक्यातील लिंगाळी हद्दीतील लोंढे मळा याठिकाणी चोरट्यांनी घर फोडून पती पत्नीला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत २ लाख ८४ हजार रूपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि.२४) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश वत्रे यांचे वडील शिवाजी वत्रे आजारी असून त्यांच्या उपचारासाठी आई, बहीण यांना सोबत घेऊन तिघांना आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये सोडले होते. त्यानंतर फिर्यादी लिंगाळीमधील घरी आले होते.

रात्री जेवण करून अविनाश त्यांची पत्नी कोयल, मुलगा रियांश हे सर्वजण घरात झोपले होते. रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्यावर लाथ मारून दरवाजा तोडला. घरात प्रवेश केला. यादरम्यान पती पत्नीला मारहाण करीत दम देत शांत बसण्यास सांगितले. कपाट उघडून कपडे अस्ताव्यस्त फेकून सोन्याचे मंगळसूत्र, मुलगा रियांश याचे कानातील डुल, रोख रक्कम  जबरीने काढून घेतले. अविनाश त्यांचा मुलगा व पत्नी या तिघांना अंगावर पांघरुन घेऊन झोपण्यास सांगितले. चोरटे घरातील इतर खोल्यात चोरी करण्यासाठी गेले. पांघरुन काढून पाहिल्यावर चोरटयांनी पुन्हा दांडक्याने मारहाण केली. अविनाश म्हणाला, ‘आम्हाला मारु नका तुम्हाला जे पाहीजे ते सर्व देतो. पुन्हा चोरट्यांनी घरातील बेडरुमचे दरवाजे तोडून इतर ठिकाणी शोधाशोध सुरू केली.’ तिघे झोपलेल्या बेडरुमचा दरवाजाला कडी लावून चोरटे फरार झाले. हा प्रकार वत्रे यांनी फोनवरून आजूबाजूला राहणाऱ्यांना सांगितला तसेच घराकडे येण्याची विनंती केली. माहिती मिळताच काही वेळात दौंडचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

नेलकटरने कानातील डूल काढले
अविनाश यांना रियांश हा लहान मुलगा आहे. चोरट्यांनी या लहान मुलांच्या कानातले डुल ओढून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पती पत्नीने त्यास विरोध केला. आम्ही काढून देतो अशी विनंती करीत असताना चोरट्यांना पुन्हा त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. अखेर चोरट्यांनी नखे काढण्याच्या नेलकटरच्या साहाय्याने कानातले डुल काढून घेतले.

चोरट्यांना होती अविनाशची इत्यंभूत माहिती
अविनाश यांचा पाणी फिल्टरचा व्यवसाय असून त्यांचे वडील आजारी असून घरात इतर सदस्य नाही. याबाबत चोरट्यांना माहिती कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेदरम्यान एक चोरटा बेडरूमच्या बाहेर उभा होता. त्याने अविनाश यांना आवाज देवुन म्हणाला, ये अव्या तुझ्या फिल्टरच्या आजच्या धंद्याचे पैसे कोठे आहेत. मला माहीत आहे, आज तुझे आई वडील घरी नाहीत. ते ऑपरेशनसाठी पुण्याला गेलेले आहे. घरातील पैसे आणि सोने कोठे ठेवले आहेत. गुपचुप सांग नाहीतर तुला जिव मारु अशी धमकी दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
या घटनास्थळी बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

हे ही वाचा : 

Back to top button