सावजाचा पाठलाग करताना बिबट बछडा पडला विहिरीत | पुढारी

सावजाचा पाठलाग करताना बिबट बछडा पडला विहिरीत

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  सावजाचा पाठलाग करताना बिबट बछडा विहिरीत पडला. परंतु वनविभागाने विहीरीत पिंजरा सोडून बछड्याला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिल्याची घटना नागापूर (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत पवार मळ्यात बुधवारी (दि. २५) सकाळी घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागापूर गावाच्या दक्षिणेला पवार मळा आहे. तेथे कुमार दिनकर गायकवाड यांची शेती आहे. त्यांची शेती करणारे हरिदास जयराम यलभर हे बुधवारी (दि. २५) सकाळी सहा वाजता वीजपंप सुरु करण्यासाठी विहिरीवर आले असता त्यांना विहिरीतून मोठ्याने आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावले तर त्यांना बिबट बछडा दिसला.

त्याच वेळी विहीरीत एका बाजूला रानमांजर देखिल होते . काही वेळाने रानमांजर पाईपाच्या साह्याने वर निघून गेले. हरिदास यलभर यांनी नागापूर गावचे सरपंच गणेश यादव, सुनील शिंदे व वन विभागाला घटनेची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनमंडलाधिकारी प्रदिप कासारे, वनरक्षक सूर्यकांत कदम व रेस्क्यू टिमचे सदस्यांनी पिंजरा विहीरीत सोडून बछड्याला सुखरूपपणे वर काढले. पकडलेला बिबट बछडा हा अंदाजे एक वर्ष वयाचा असून त्याला अवसरी घाटीतील वन उद्यानात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवून दुपारनंतर पुन्हा त्याच ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी प्रदीप कासारे यांनी दिली.

हे ही वाचा : 

Back to top button