Chandrakant Patil : विषय लवकर मार्गी लागण्यासाठी मोर्चे काढा! उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे राज्यकर्ता असूनही सांगतो की, काही विषय लवकर मार्गी लागावेत, असे वाटत असेल तर मोर्चे काढा. तुम्ही आरडाओरडा केल्यावर आम्हालाही आढावा बैठक वगैरे लावावी लागते, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित महिला सक्षमीकरण परिषदेच्या उद्घाटना वेळी ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 'जगातील अनेक देशांमध्ये लोकशाहीच्या सुरुवातीला महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. मात्र, भारतात पहिल्या निवडणुकीपासून महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यासाठी आंदोलने, संघर्ष करण्याची वेळ आली नाही. त्यामुळे महिलांना मातृत्वाची रजा, नोकरीच्या ठिकाणी पाळणाघर, अशा सुविधा निर्माण झाल्या. शिक्षण क्षेत्रातील काही विषय चर्चा करून, कधी संघर्ष करून मार्गी लावावे लागतील. महाविद्यालयांमध्ये मुलींचे प्रवेश वाढणे, महाविद्यालयीन मुलींना मोफत पास, ओरिसात महाविद्यालयीन मुलींना दिलेल्या दुचाकीच्या धर्तीवर महाराष्ट्रात तसे करता येईल का, याचा विचार केला पाहिजे.'

डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, 'शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये दर्जेदार शिक्षण आणि लिंग समानता यांचा समावेश करण्यात आला आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत समाजात चर्चा होणे अपेक्षित आहे. परिषदेत सहभागी प्रतिनिधींची समन्वयक किंवा महिला सक्षमीकरण दूत म्हणून नियुक्त करण्यात यावी. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील सर्व महाविद्यालयांमध्ये महिला सक्षमीकरण कक्षाची स्थापना करण्यात यावी.' प्रास्ताविकात डॉ. देवळाणकर यांनी परिषदेच्या आयोजनाविषयी माहिती दिली.

'शर्ट बदलून तीन मिनिटांत बाहेर पडलो'

माझ्यावर दोन वेळा शाई फेकण्यात आली. लोकांना वाटले, मी घाबरून बंद खोलीत रडत बसेन. पण, मी शर्ट बदलून तीन मिनिटांत बाहेर पडलो, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news