वेल्हे तालुका होणार आता ’राजगड’ ; सरकारकडून नामांतराची कार्यवाही अंतिम टप्प्यात

वेल्हे तालुका होणार आता ’राजगड’ ; सरकारकडून नामांतराची कार्यवाही अंतिम टप्प्यात
खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  वेल्हे तालुक्याचे नामांतर 'राजगड' तालुका करण्याची राज्य सरकारची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडाची यामुळे राज्यासह जगभरात तालुका म्हणून नव्याने ओळख होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यापूर्वी पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे (कात्रज) अध्यक्ष भगवान पासलकर यांनी जनतेच्या मागणीनुसार वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्याच्या मागणीकडे पवार यांचे लक्ष वेधले.
संबंधित बातम्या :
त्यासंदर्भातील निवेदनही त्यांना देण्यात आले. त्यानंतर आढावा बैठकीत पवार यांनी  मंत्रालयात संबंधित  सचिवांना फोन करून याबाबत माहिती घेतली. त्या वेळी राजगड तालुका नामांतराबाबत शासनाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे सचिवांनी सांगितले.
स्थानिक मावळा जवान संघटनेच्या वतीने नामांतरासाठी गेल्या सात वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे व तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह ग्रामपंचायतींनीही मागणी लावून धरली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्याची मागणी विरोधी पक्षनेते असताना शासनाकडे केली होती. तेव्हापासून ते याबाबत पाठपुरावा करत आहेत.   छत्रपती श्रीशिवरायांच्या मानव कल्याणकारी कार्याचा जिवंत वारसा राजगडाला लाभला आहे. वेल्हे तालुक्याला राजगडाचे नाव दिले जाणार असल्याने नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे.
                                               -भगवान पासलकर,  अध्यक्ष, पुणे जिल्हा  सहकारी दूध संघ (कात्रज) 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news