Pune Drugs Case : ललित पाटलाने ड्रग्जचा कारखाना कसा उभा केला? वाचा सविस्तर स्टोरी.. | पुढारी

Pune Drugs Case : ललित पाटलाने ड्रग्जचा कारखाना कसा उभा केला? वाचा सविस्तर स्टोरी..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना ललित पाटील याच्या सांगण्यावरूनच अरविंदकुमार लोहारे याने मेफेड्रॉन बनविण्याचे प्रशिक्षण हरिश पंत याला दिले होते. त्याच्याच मदतीने नाशिक येथील शिंदे गावात ड्रगचा कारखाना सुरू केल्याची धक्कादायक माहिती पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे. याचे सर्व प्लॅनिंग ललित पाटीलनेच केले होते.
या प्रकरणात भूषण अनिल पाटील (वय 34), अभिषेक विलास बलकवडे (वय 31, दोघेही रा. नाशिक) यांना न्यायालयाने एक दिवसाची, तर अरविंदकुमार प्रकाशचंद लोहारे (43, ओशिवरा, मुंबई; मूळ रा. उत्तर प्रदेश) याला 25 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, यापूर्वी या प्रकरणात सुभाष मंडल, रौफ शेख यांना अटक करण्यात आली होती. अरोपी रेहान शेख याला या गुन्ह्यात अटक झाली असून, त्याला 27 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी ललित पाटील हा सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या दोन्ही मैत्रिणींनाही गुन्ह्यातील सहभागावरून अटक झाली आहे.

पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातून चालणारे ड्रगचे रॅकेट उघड केल्यानंतर ड्रगतस्कर ललित पाटील याचा सहभाग समोर आला होता. त्याला अटक होण्याच्या भीतीतून त्याने आपल्या दोन मैत्रिणी, भूषण पाटील यांच्या मदतीने ससून रुग्णालयातून धूम ठोकली होती. पुढे या गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यानंतर मुंबई पोलिसांनी भूषण पाटीलचा नाशिक येथील ड्रगचा कारखाना शोधून काढत मोठ्या प्रमाणावर ड्रग जप्त केले होते. गुन्ह्यात तपास पुढे जात असताना सुरुवातीला सुभाष मंडल, रौफ शेख यांना अटक झाली. दरम्यान, गुन्ह्याचा मास्टर माइंड असलेला भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर मुंबईत ड्रग पोहचविणार्‍या रेहान शेखला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान, ललितच्या मैत्रिणी प्रज्ञा कांबळे व आणखी एका मैत्रिणीला अटक करण्यात आली. अरविंदकुमार लोहारे याचादेखील गुन्ह्यात मोठा सहभाग असल्याने त्याला अटक करून रविवारी दुपारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सरकारी वकील योगेश कदम यांनी युक्तिवाद करताना पोलिस कोठडीची मागणी केली. या वेळी त्यांनी भूषण पाटील, रौफ शेख, बलकवडे तसेच अटक करण्यात आलेल्या दोन महिलांना समोरासमोर करून तपास करायचा असल्याने त्यांनी लोहारेला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

या कारणास्तव लोहरेला पोलिस कोठडी
लोहारे हा मेफेड्रॉन तस्करीतील सराईत गुन्हेगार असून. त्याच्यावर नाशिक येथील पोलिस ठाण्यात 2018 मध्ये अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याच्यावर पुण्यातील चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. चाकण परिसरात 2020 मध्ये शेकडो कोटींचे ड्रग जप्त करण्यात आले होते. त्या गुन्ह्यातही लोहारेचा सहभाग होता. तो नाशिकच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. चाकण येथील गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात होता. त्याचा या गुन्ह्यातही सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली, तर नाशिकच्या गुन्ह्यात त्याचा एक साथीदार हरिश पंत यालादेखील अटक करण्यात आली होती. तो त्या गुन्ह्यात जामिनावर आहे. लोहारे याचे एमएस्सी केमस्ट्रीपर्यंत शिक्षण झाले असून,
तो एका केमिकल कंपनीत कामाला होता.

लोहारेने दिले इतरांना प्रशिक्षण
आरोपींना मेफेड्रॉन तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्याचे यापूर्वीच्या दाखल गुन्ह्यात निष्पन्न झाले आहे. ललित पाटील याच्या सांगण्यावरून लोहारे याने हरिश पंत याला देखील मेफेड्रॉन बनविण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यांनी भूषणच्या मदतीने शिंदे गावात ड्रगचा कारखाना सुरू केला होता.

याचा करायचा आहे तपास
भूषण आणि बलकवडे यांनी पंतशी कोठे संपर्क केला? ड्रग बनविण्यासंबंधी त्यांच्यात काय चर्चा झाली? त्यांना आणखी कोणी यामध्ये मदत केली? आदीचा सखोल तपास करायचा असल्याने लोहारे याला पोलिस कोठडी देण्यात आली.

भूषण, बलकवडे, रौफ संपर्कात
नाशिक येथील कारखान्यातील तपार होणारे ड्रग भूषण आणि बलकवडे यांनी रौफला वारंवार विक्रीकरिता दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याचदरम्यान गुन्ह्यातील आरोपी ललित, भूषण, बलकवडे यांच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गेटवर जप्त झालेले ड्रग शिंदे गावातील  ससून रुग्णालयाच्या गेटजवळ जप्त करण्यात आलेले मेफेड्रॉन हे नाशिक येथील शिंदे गावातील एमआयडीसीमधील श्रीगणेशाय एंटरप्रायझेस नावाच्या कारखान्यात तयार करण्यात आल्याचे व नंतर त्याची वाहतूक करून व्यापार केल्याचे व
विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे.

Back to top button