पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाला मुहूर्त मिळेना | पुढारी

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाला मुहूर्त मिळेना

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील तसेच, शहरातील नेतेमंडळी सतत सांगत आहेत की, पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम लवकरच सुरू होईल. मात्र, प्रत्यक्षात काम काही अजून झालेले नाही. प्रकल्पास विलंब होत असल्याने शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. खरोखरच काम सुरू करणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पिंपरी ते दापोडी हा 7.9 किलोमीटर अंतराचा मेट्रो मार्गावरून मेट्रो 1 ऑगस्ट 2023 पासून धावत आहे. तर, पिंपरी ते फुगेवाडी मार्ग 6 मार्च 2022 पासून सुरू झाला आहे. या मार्गाच्या कामासोबत पिंपरी ते निगडी या 4.413 किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम सुरू करावे, अशी नागरिकांची आग्रही मागणी होती. मात्र, केंद्र सरकारने खर्चाबाबत हात आखडता घेतला असून, केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाकडे सुधारीत फेरप्रस्ताव पडून आहे. मंजुरीस 2 वर्षांपेक्षा अधिक विलंब झाल्याने हे काम रखडले आहे.

केंद्राची अंतिम मंजुरी काही दिवसात

केंद्राची अंतिम मंजुरी काही दिवसात मिळेल. काम सुरू होईल. केवळ एक सही राहिली आहे, असे मंत्री व नेतेमंडळीकडून वारंवार सांगितले जात आहे. नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, काम काही सुरू होत नसल्याने नाराजी वाढली आहे. मेट्रो नसल्याने निगडी, आकुर्डी, चिंचवड व परिसरातील भागांतील नागरिकांना पिंपरीपर्यंत दुसर्‍या वाहनांतून प्रवास करावा लागत आहे.

मंजुरीचे पत्र आलेले नाही

पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मार्गाचा सुधारित फेरप्रस्ताव केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. अद्याप मंजुरीचे पत्र मिळालेले नाही, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

अडथळे हटवा

या प्रकल्पास मंजुरी मिळाली असून, लवकरच त्याची घोषणा केली जाईल. त्यापूर्वी चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुल ते निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंतच्या मार्गावरील मेट्रो मार्गिकेच्या कामास अडथळे ठरणारे दिव्यांचे खांब, विविध सेवावाहिन्या हटविण्याचे काम सुरू करावे, अशा सूूचना महापालिका प्रशासनाला दिल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

या मार्गावर तीन स्टेशन

दरम्यान, या विस्तारीत मार्गावर चिंचवड स्टेशन येथील पिंपरी पोलिस ठाणे, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक असे तीन स्टेशन असून, 946 कोटी 73 लाख रूपयांचा खर्च आहे. कामास दोन वर्षे लागू शकतात. या मार्गामुळे निगडी ते दापोडी या मुख्य मार्गावर 12.50 किलोमीटर अंतराची मेट्रो प्रवासी सेवा उपलब्ध होईल.

हेही वाचा

‘तेज’मुळे अशी असेल महाराष्ट्रात पावसाची स्थिती !

सावधान… इन्कम टॅक्सचं आपल्यावर लक्ष आहे..!

Lalit Patil Drug Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित

Back to top button