तेलंगणा विधानसभेतील ९०% आमदार करोडपती, महिला लोकप्रतिनिधींची संख्या नगण्य

तेलंगणा विधानसभेतील ९०% आमदार करोडपती, महिला लोकप्रतिनिधींची संख्या नगण्य
Published on
Updated on
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तेलंगना राज्यातील आमदार गुन्ह्यांमध्ये आणि गर्भश्रीमंत असण्यामध्ये चांगलेच आघाडीवर आहेत. तेलंगनातील ६१% आमदारांवर फौजदारी खटले दाखल आहेत तर तेलंगनातील ९०% आमदार करोडपती आहेत. ११९ जागा असलेल्या तेलंगना विधानसभेत केवळ ६ महिला आमदार आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रेफरन्स (एडीआर) संस्थेने एक महत्त्वाचा अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये तेलंगना विधानसभेतील ११८ आमदारांची परिस्थिती सांगितली आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज आणि प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ही माहिती गोळा करण्यात आली आहे.
एडीआरच्या या माहितीनुसार ११८ पैकी ७२ आमदारांवर (६१%) खटले दाखल आहेत. ज्यात खुन, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश गुन्हा आहे. आर्थिक निकषांमध्ये मात्र मुख्यमंत्री के सी आर यांच्या भारत राष्ट्र समितीच्या आमदारांचा पहिला क्रमांक लागतो. या अहवालातील आर्थिक बाबी पाहिल्या तर तेलंगनातील आमदार मालामाल असल्याचे दिसून येते.
तेलंगनातील ११८ पैकी १०६ आमदार म्हणजे ९० % आमदार करोडपती आहेत. यामध्ये तेलंगनात सत्तेत असलेल्या भारत राष्ट्र समितीचा पहिला क्रमांक लागतो. त्यांच्या खालोखाल एमआयएम पक्षाचा क्रमांक लागतो. भारत राष्ट्र समितीचे ९३ टक्के आमदार करोडपती आहेत तर एमआयएमचे ५ आमदार करोडपती आहेत. या यादीमध्ये काँग्रेसचे ४ तर भाजपचे २ आमदार आहेत. भारत राष्ट्र समितीचे मर्री जनार्दन रेड्डी हे सगळ्यात श्रीमंत आमदार आहेत. त्यांची संपत्ती 161 कोटींहुन अधिक आहे तर एमआयएमचे सईद अहमद पाशा हे सर्वात गरीब आमदार आहेत. त्यांची संपत्ती १९ लाख आहे.
गुन्हे आणि पैशाच्या बाबतीत आघाडीवर असलेले आमदार शिक्षणाच्या बाबतीत मात्र काहीसे पिछाडीवर आहेत. एकूण आमदारांपैकी ३६% आमदार इयत्ता ५ वी ते १२ वी दरम्यान शिकले आहेत. ५८ % आमदारांनी पदवी किंवा त्याच्या पुढचे शिक्षण घेतलेले आहे. २०१८ ला निवडून आलेल्या १६  आमदारांनी पक्षबदल केला आहे. यातील बहुतांश आमदारांनी काँग्रेसकडून भारत राष्ट्र समितीची वाट धरली आहे. एकूण या अहवालामध्ये सर्वच क्षेत्रात भारत राष्ट्र समितीच्या आमदारांचा बोलबाला आहे.

सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदार कोण?

श्रीमंत आमदारांच्या यादीत प्रथम असलेले मर्री जनार्दन रेड्डी हे भारत राष्ट्र समितीचे आमदार आहेत. नगरकुरनूल जिल्ह्यातील नगरकुरनूल विधानसभेतून निवडून आले आहेत. त्यांची संपत्ती १६१ कोटींपेक्षा अधिक आहे. गरीब आमदारांच्या यादीत प्रथम असलेले एमआयएमचे सईद अहमद पाशा हे हैदराबाद जिल्ह्यातील याकूतपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांची संपत्ती १९ लाखाहून अधिक आहे.
एकूण आमदारांमध्ये महिलांची संख्या मात्र बोटावर मोजण्या इतकी आहे. तेलंगना विधानसभेत केवळ ६ महिला आमदार आहेत. तरुण आमदारांची संख्या देखील तुलनेने कमी आहे. ३६ टक्के आमदार ३१ ते ५० वर्ष वयोगटातील आहे तर ६४% आमदार हे ५१ ते ८० वर्ष वयोगटातील आहेत.

पक्षनिहाय आमदारांची संख्या:

भारत राष्ट्र समिती १०१
एमआयएम ७
काँग्रेस २
अपक्ष २
भाजप २
एकुण ११८ (१ जागा रिक्त असल्यामुळे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news