

शेळगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथे अश्विनी सागर म्हस्के (वय 28) व त्यांची मुलगी सानवी (वय 4) या मायलेकी शुक्रवारी (दि.20) राहत्या घरात पत्र्याच्या छताला गळफास लागून मृतावस्थेत लटकलेल्या आढळून आल्या. नंतर या मायलेकीचा अंत्यविधी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील अश्विनी यांच्या माहेरच्या भोंग परिवारातील मंडळींनी आरोपी पती सागर म्हस्के याच्या दारातच रात्री 11 वाजता शोकाकुल व तणावाच्या वातावरणात केला.
वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी तातडीने भेट देऊन अश्विनी यांचा पती सागर याला त्वरित ताब्यात घेतले. पती सागर म्हस्के, दीर शेखर म्हस्के, सासू सीताबाई म्हस्के यांच्यावर अश्विनी सागर म्हस्के व सानवी सागर म्हस्के या मायलेकीच्या मृत्यूस जबाबदार धरून गुन्हे दाखल करून पती सागर म्हस्के याला अटक केली. दीर शेखर म्हस्के व सासू सीताबाई म्हस्के यांना अटक केल्याशिवाय आम्ही मृतदेहांचा अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईक या मायलेकीचे मृतदेह वालचंदनगर पोलिस ठाण्यात घेऊन आले. आरोपीना अटक करावे म्हणून पोलिसांना घेराव घातला.
माहेरच्या भोंग परिवारातील बाबजी भोंग, संदीप भोंग, मनोज भोंग, राजाराम आदलिंग, गोरख आदलिंग, हेमंत भोंग यांच्यासह अन्य नातेवाइकांनी मुलीकडच्या मंडळीची समजूत काढली व सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी दीर व सासू यांना लवकर अटक करण्यात येईल, असे सांगितल्यानंतर या मायलेकीचे मृतदेह वालचंदनगर पोलिस स्टेशनवरून हगारेवाडी येथे घेऊन गेले. अश्विनी म्हस्के यांच्या माहेरकडील भोंग परिवाराने या मायलेकीचा अंत्यविधी हा आरोपी पती सागर म्हस्के याच्याच दारात करायचा, असा पवित्रा घेतला आणि रात्री अकरा वाजता मोठ्या तणावाच्या व शोकाकुल वातावरणात अंत्यविधी केला.
मृत अश्विनी यांची थोरली मुलगी राधा ही मागील काही दिवस आजारी असल्यामुळे ती शाळेत गेली नव्हती. परंतु शुक्रवारी घटनेच्या दिवशी ती शाळेत गेल्याने तिचा जीव वाचला, असे नातेवाइकांनी सांगितले.
हगारेवाडी (ता. इंदापूर) येथील अश्विनी सागर म्हस्के व सानवी सागर म्हस्के यांच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला दीर शेखर तात्याराम म्हस्के याला वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी शनिवारी (दि. 21) अटक केली.
हेही वाचा