

जंक्शन : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील द्राक्ष बागायतीसाठी प्रसिद्ध असलेल्या बोरी (ता. इंदापूर) गावातील सुमारे शंभर एकर द्राक्ष बागांचे मोठे नुकसान भेसळयुक्त रासायनिक खतामुळे झाले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकर्यांचे यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बोरी गावात जास्त प्रमाणात द्राक्षबागा असल्याने नुकसानग्रस्त शेतकर्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांनी भेसळयुक्त रासायनिक खतनिर्मिती करणार्या कंपनीकडून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. रमेश शिंदे, पंकज शिंदे, अमोल शिंदे, संतोष जगताप यांच्यासह सुमारे 50 शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्हातील बोरी गाव द्राक्षाचे आगार समजले जाते.
संबंधित बातम्या :
या परिसरामध्ये शेतकर्यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून खडकाळ माळरानावर आधुनिक द्राक्षशेती केली आहे. पाणी साठविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेततळी तयार केली आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात द्राक्ष माल छाटणी सुरू असते. सध्या काही बागांची छाटणी झाली असून, द्राक्षाला खते टाकणे व द्राक्ष छाटणीची कामे वेगात सुरू आहेत. या परिसरातील सुमारे 50 शेतकर्यांनी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या, दुसर्या व तिसर्या आठवड्यामध्ये रासायनिक खतांचा बेसल डोस दिला होता. यामध्ये स्थानिक कंपनीची सल्फर ऑफ पोटॅश (एस.ओ.पी) या खताचा वापर द्राक्षाच्या मुळाजवळ केला होता.बागेमध्ये टाकण्यात आलेले एस. ओ. पी.चे खत भेसळयुक्त असल्याचा शेतकर्यांचा आरोप आहे.
या खतामध्ये तणनाशकाचा अंश असल्याची शेतकर्यांना शंका आहे. भेसळयुक्त रासायनिक खतामुळे द्राक्षाच्या झाडांच्या पानांची वाढ खुंटली असून पाने करपू लागली आहेत. नुकसानग्रस्त द्राक्षबागांना चालू वर्षी माल न लागल्यास हंगाम वाया जाणार आहे. शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. सध्या 100 एकरामधील द्राक्षबागांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
नमुने तपासणीसाठी पाठवले
इंदापूरचे कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर व पंचायत समितीचे गुणनियंत्रण निरीक्षक राजेंद्र काळे यांनी नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी केली. रासायनिक खते विक्री करणार्या दुकानातून एसओपी खताचे नमूने घेतले असून, तपासणीसाठी तातडीने पाठवले असल्याचे सांगितले.