

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आर्थिक व्यवहारातून प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलास जीवन संपवण्यास प्रवृत्त करणार्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी शिंदेवस्ती, सोमाटणे येथे घडली होती. डेबू राजन खान, असे जीवन संपवल्या तरुणाचे नाव आहे. पांडुरंग सूर्यवंशी उर्फ देवा (रा. हडपसर, पुणे) प्रतीक जाधव, (रा. भारती विद्यापीठ, पुणे), गणेश वाळुंज आणि आकाश बारणे उर्फ नन्या माऊली वडेवाले (दोघेही रा. कात्रज, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी डेबू यांच्या बहिणीने मंगळवारी (दि. 17) तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ डेबू याने आरोपींना बचत गटाचे तसेच बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे दिले होते. दरम्यान, डेबू आरोपींकडे पैसे माघारी मागत होता. मात्र, आरोपींनी पैसे आम्हाला दिलेच नाहीत, असे म्हणून टाळाटाळ केली. तसेच, न वटणारे धनादेश देऊन फिर्यादी यांची बोळवण केली. अशा प्रकारे आरोपींनी वारंवार दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून डेबू यांनी 2 ऑक्टोबर रोजी शिंदेवस्ती, सोमाटणे येथे गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होत. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.
हेही वाचा