Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील उद्या जुन्नरला | पुढारी

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील उद्या जुन्नरला

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नरच्या शिवजन्मभूमीत शुक्रवारी (दि. २०) मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील येणार आहेत. त्यांच्या स्वागताची जुन्नर शहरात जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती ॲड. सचिन चव्हाण यांनी दिली. ॲड. चव्हाण यांनी सांगितले की, मनोज जरांगे पाटील सकाळी सात वाजता शिवनेरी किल्ल्यावर जाऊन श्रीशिवाजी महाराज जन्मस्थळी नतमस्तक होऊन तेथील माती कपाळी लावून महाराजांची प्रेरणा घेऊन गडाच्या खाली आल्यावर मराठा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जरांगे पाटील गुरुवारी (दि. १९) रात्री उशिरा जुन्नर येथे मुक्कामी येणार आहेत.

त्यांच्यासोबत १५० कार्यकर्त्यांचा फौजफाटा असणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असून, जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स लागले आहेत. तसेच विविध ठिकाणी कमानी उभारल्या जाणार आहेत. जुन्नर शहरात आल्यावर त्यांच्यावर जेसीबीमधून फुलांची उधळत केली जाणार आहे व ढोल-ताशाच्या गजरात हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत होणार आहे, अशी माहिती नरेंद्र तांबोळी यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button