

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील ह्याच्या कारखान्यात दर्जेदार मेफेड्रॉन बनविण्यामध्ये शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित हे एक्स्पर्ट असल्याचे व त्यांना हा फॉम्युला ललित पाटील यानेच दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत पुणे पोलिसांनी या प्रकरणात 12 आरोपी निष्पन्न केले असून, त्यातील चौघांना लवकरच पुणे पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
याप्रकरणातील आरोपी भूषण पाटील, अभिषेक बलकवडे हे सध्या पुणे पोलिसांच्या कोठडीत असून, त्यांच्याकडे करण्यात आलेल्या
तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. शिवाजी शिंदे, राहुल पंडित, गोलू उर्फ रेहान अन्सारी आणि जिशान शेख हे आरोपी सध्या नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणी साकीनाका पोलिसांच्या कोठडीत आहे.
या आरोपींना पुणे पोलिस लवकरच ताब्यात घेऊन त्यांच्याकडे ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणार आहेत. त्यामुळे अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ललित पाटीलबरोबरच 3 इतर आरोपी फरार आहेत. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांनी नाशिक येथे ड्रग्ज बनविण्याचा कारखानाच उभा केला होता. त्या कारखानाचा सगळा सेटअप शिवाजी शिंदे (रा. नाशिक) याने करून दिल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.
शिवाजी शिंदे हा भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना कच्चा मालसुद्धा पुरवत होते. ड्रग्जची कंपनी चालवण्याची सगळी जबाबदारी ही भूषण पाटीलकडे होती. महत्त्वाचं म्हणजे भूषण पाटीलला कारखान्याच्या सेटअप लावून देणारा हा शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित यांचा दर्जेदार मेफेड्रोन बनवण्यात या दोघांचा हातखंडा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे जरी असले तरी दिवसेंदिवस गुन्ह्यांची व्याप्ती वाढत असाताना फरार ललित पाटील पोलिसांच्या हाती लागल्यास ड्रग्ज तस्करीतील मोठे कनेक्शन उघड होईल.
हेही वाचा