

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निष्कारण आरोप केले जात असून, राज्याच्या विकासाची स्वप्ने पाहणार्या जनसेवकाला बदनाम करण्याचे व राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे, अशी टीका कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. येरवडा येथील जागेची निविदा राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनीच रद्द केली असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
साखर संकुल येथे मंगळवारी आयोजित रब्बी हंगामाच्या नियोजन व धोरण बैठकीपूर्वी कृषिमंत्री मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री व तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी येरवडा येथील मोक्याची जागा एका खासगी विकासकाला देण्यासाठी आग्रह धरल्याचा दावा माजी आयपीएस अधिकारी व पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला आहे. त्याबाबत विचारणा केली असता मुंडे म्हणाले, की येरवडा येथील जागेसाठी 'पीपीपी' तत्त्वावर निविदा राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आदेशानेच काढण्यात आली.
त्या वेळी तक्रार करण्याऐवजी निवृत्त झाल्यावर पुस्तकात दावे करून एखाद्याला बदनाम करणे मोठ्या अधिकार्यांना शोभणारे नाही. तत्कालीन गृहमंत्र्यांनीच या जागेची निविदा रद्द केली आहे. तरीही जागा वाचविल्याचे श्रेय घेण्यासाठी अजित पवार यांच्यावर आरोप केले जात आहेत. पक्षाच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री व्हावे, हे कार्यकर्त्यांचे स्वप्न असते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला संधी असताना, मुख्यमंत्रिपद सोडले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे होते की नाही, याचे उत्तर आमच्या दैवताकडे आहे का? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा