Rohit pawar : अजित पवारांची ताकद कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न; रोहित पवारांचा आरोप | पुढारी

Rohit pawar : अजित पवारांची ताकद कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न; रोहित पवारांचा आरोप

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत अचानक गंभीर आरोपांचा मुद्दा पुढे आला आहे. त्यावर त्यांना उत्तर द्यावे लागत आहे. त्याबाबत भाजप काहीही बोलत नाही. अजित पवार हे लोकांमधील नेते आहेत. त्यांची ताकद कमी करण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. भाजपची हीच प्रवृत्ती असून त्यांनी अनेकांना राजकीयदृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न याआधी केलेला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी केला.

पिंपरी-चिंचवड शहराच्या दौर्‍यावर आलेले आमदार पवार पत्रकारांशी बोलत होत. ते म्हणाले, की निवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरणवकर यांच्या आरोपांबाबत एक बाजू मी बोललो होतो; पण लोकांमधून अजित पवार यांना संपविण्याचा हा प्रयत्न असल्याची दुसरी बाजू बोलली जात आहे. भाजपने याआधी तसे केलेले आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे अशा नेत्यांबाबत तसे घडले आहे. आजही पंकजा मुंडे यांना पक्षात संघर्ष करावा लागत आहे. तेच अजित पवार यांच्याबाबत होत असावे. तसे करून भाजपला वाटते स्पर्धा संपते.

मात्र, तसे होत नाही. ते उत्तरेकडील राज्यात चालते. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ती नेत्यांच्या मागे न जाता विचारांवर ठाम राहते. ते म्हणाले, की अजित पवार गटात गेलेले काही लोक संपर्कात आहेत. तेथील अनेकांची चलबिचल चालली आहे. त्यांच्यात अस्वस्थता आहे. ते लवकरच आमच्याकडे येतील. लोकांतील लोक कधी दबावतंत्राला घाबरत नाहीत. जे कोणी राजकारण खराब करणार्‍याविरुध्द संघर्ष करायला तयार आहेत, त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. कोणाचे पालकमंत्रीपद काढले आणि कोणाला दिले यावरून भाजपमध्येही संघर्ष दिसत आहे. भाजपच्या निष्ठावंतांमध्ये मोठी नाराजी आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण करणार : मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास

Nashik Accident : अपघातात दोन कर्त्या तरुणांचा मृत्यू, कोनांबे गावावर शोककळा

वादळात कोसळलेल्या झाडापासून बनवली शाई

Back to top button