

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हाय प्रोफाईल पार्ट्या आणि रात्रभर गजबज असलेला पुणे स्टेशन परिसरातील राजा बहादूर मिल परिसर अधूनमधून चांगलाच चर्चेत असतो. सोमवारी पुन्हा एकदा तो चर्चेत आला असून, उत्पादन शुल्कच्या एका अधिकार्याने पहाटे चारच्या सुमारास येथील हॉटेलमधील वेटरला मारहाण केली. त्यानंतर हॉटेलबाहेरील तरुणीशी वाद घातला. ड्रामा नाईन हॉटेलमध्ये हा
प्रकार घडला असून, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ दिवसभर व्हायरल झाला होता.
मिलमध्ये हा पहिल्यांदाच प्रकार घडला आहे, असे नाही. मात्र, तो समोर येत नाही की तो समोर येऊ नये म्हणून प्रयत्न करणारी पोलिस दलातील एक यंत्रणा काम करते? हा मोठा सवाल आहे. त्याचा शोध पोलिस आयुक्तांनी घेणे गरजेचे आहे. पुणे स्टेशन परिसरात 'राजा बहादूर मिल' असून, याठिकाणी शहरातील नामांकित हॉटेल आणि पब आहेत. रात्रभर येथे तरुणाईची गर्दी असते. यामुळे अनेकदा मिल परिसर चर्चेत असतो. यापूर्वी अनेकदा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी येथील हॉटेलवर कारवाईदेखील केलेली आहे.
यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यात उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक दर्जाचा अधिकारी वेटरला मारहाण करीत असल्याचे दिसत आहे.
मागील आठवड्यात मध्यरात्री चारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यात अधिकारी हा एका तरुणीशी हुज्जत घालत असल्याचे दिसत आहे. यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. दरम्यान,
याबाबत बंडगार्डन पोलिसांशी संपर्क साधला असता, सदर प्रकरणात कुणाचीही तक्रार आली नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.
स्टेशन भागातील राजा बहादूर मिल परिसरातील अनेक हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत हायप्रोफाईल पार्ट्या सुरू राहतात. आवाजाचा गोंगाट करत कर्णकर्कश आवाजात त्यांच्याकडून मद्यधुंद रात्र जागवली जाते. यामध्ये अनेकदा नशेत बेधुंद झालेल्यांकडून वादाचे प्रकार घडतात. मात्र, हे प्रकार स्थानिक पोलिस ठाण्यापर्यंत येऊन गुन्हे दाखल होत नाहीत. सातत्याने घडणारे हे प्रकार अतिवरिष्ठ पोलिस अधिकार्यांपर्यंत गेल्यास 'फटका' बसेल, या भीतीने ते आधीच मिटविले जातात, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. तर, काही पोलिस कर्मचार्यांचा तेथे मुक्कामच असतो. हे 'महोदय' पोलिस खात्यासाठी कमी अन् 'मिल'साठी जास्त काम करीत असल्याची चर्चा आहे.
माध्यमात प्रसारित झालेल्या संबंधित व्हिडिओबाबत उपअधीक्षक यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे याबाबत चौकशी झाल्यानंतर सविस्तर सांगता येईल. जर ते अधिकारी दोषी आढळले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल.
– चरणसिंह रजपूत, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग
हेही वाचा