एसटी : ‘लालपरी’ला ब्रेक! एसटीच्या सर्व बसेस आगारांत ‘लॉक’ | पुढारी

एसटी : ‘लालपरी’ला ब्रेक! एसटीच्या सर्व बसेस आगारांत ‘लॉक’

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

एसटी कर्मचार्‍यांच्या काम बंद आंदोलनामुळे सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीचा बोजवारा उडाला. बुधवारी एसटी ची शंभर टक्के प्रवासी वाहतूक बंद राहिली. मंगळवारी जिल्ह्यातील सर्व आगारांतील सुमारे साडेचार हजारांपेक्षा अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाला. दुसरीकडे खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍यांकडून मात्र प्रवाशांची अक्षरश: लूट सुरू आहे. त्यांच्याकडून मनमानी दर आकारणी केली जात आहे. यामुळे प्रवाशांना फार मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मंगळवारी खासगी प्रवासी वाहनांची वाहतुकीसाठी मदत घेण्यात आली. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून काही खासगी बसेस सोडण्यात आल्या; पण या बसेसनाही जादा दर आकारणी केली जात होती. त्यामुळे प्रवाशांतून तीव— नाराजी व्यक्त केली जात होती. या चार दिवसांत एसटीच्या कोल्हापूर विभागाचे सुमारे दोन कोटींचे उत्पन्न बुडाले.

एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांतर्फे 28 ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू आहे. 7 नोव्हेंबरपासून हे आंदोलन हळूहळू तीव— होत गेले. काल, सोमवारपर्यंत जिल्ह्यातील दोन आगारांतील एसटीची प्रवासी वाहतूक सुरू होती; पण मंगळवारी मात्र जिल्ह्यातील सर्व आगारांतील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील एकाही आगारातून बस बाहेर पडू शकली नाही.

एसटी खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट

प्रवाशांची वाहतुकीची सोय करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मंगळवारपासून नियोजन करण्यात येत आहे. यासाठी खासगी बसेसना दीडपट भाडे आकारण्यास व जी वाहने रस्त्यातील प्रवाशांना घेऊन जाणार त्यांच्यासाठी टप्पा वाहतुकीप्रमाणे भाडे आकारण्याची परवानगी परिवहन विभागाने दिली आहे; पण प्रवासी वाहतूक करणार्‍या काही वाहनधारकांकडून एसटीच्या भाड्यापेक्षा तिप्पट, चौपट प्रमाणात दराची आकारणी केली जात असून, अक्षरश: प्रवाशांची लूट सुरू आहे.

स्थानकांमध्ये खासगी बसेस लावण्यास कर्मचार्‍यांचा विरोध

एसटीच्या बसेस बंद असल्यामुळे परिवहन खात्यातर्फे खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार एका खासगी बसचालकाने मध्यवर्ती बसस्थानकामध्ये बस घालून प्रवासी वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आंदोलकांना समजताच ते त्या बसचालकाजवळ आले. कर्मचार्‍यांनी बस स्थानकाबाहेर घेण्याची विनंती केली. यावेळी काहीकाळ गोंधळ उडाला. त्यानंतर एसटीतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी शाहूपुरी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी स्थानकातील ही बस बाहेर काढली. बसस्थानकासमोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एसटी कर्मचार्‍यांनी घातला जागर

एसटी कर्मचार्‍यांनी मंगळवारच्या चौथ्या दिवशी जागर आंदोलन केले. सरकारच्या नावाने जागर घालण्यात आला. गोंधळ्यांच्या वेशातील एसटीच्या कर्मचार्‍यांनी गोंधळी गीतातून मागण्या सादर केल्या. यावेळी एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण झालेच पाहिजे, विलीनीकरण आमच्या हक्काचे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. एसटीचे जोपर्यंत शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, या निर्णयावर कर्मचारी ठाम आहेत.

१००० पुणे, २५०० मुंबई

किणी : पुढारी वृत्तसेवा
एसटी कर्मचारी संपाचा गैरफायदा घेत पुणे 1 हजार, पनवेल 2 हजार तर मुंबईसाठी 2500 रुपये मागत खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. याला चाप लावणारी यंत्रणा प्रशासनात किंवा शासनाकडे आहे की नाही, असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.

एसटीची वाहतूक यंत्रणा ठप्प झाली आहे. साहजिकच सासरी जाणार्‍या महिला, नोकरीवर परत जाणार्‍या नागरिकांना मिळेल त्या वाहनानेे प्रवास करावा लागत आहे. एसटी बस बंदचा फायदा घेत खासगी वाहनचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे. तरीही प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. एरव्ही आराम बसमधून पुण्याला जाण्यासाठी 300 रुपये मोजावे लागतात. आता मात्र 1000 ते 1,200 रुपये, तर मुंबईसाठी 2000 ते 2500 रुपये आकारून प्रवाशांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

बसस्थानके पडली ओस

ज्या बसस्थानकांवरील बाकड्यांवर बसण्यासाठी प्रवाशांना जागा मिळायची नाही, तीच बसस्थानके प्रवाशांविना ओस पडल्याचे चित्र होते. ज्या नागरिकांना या संपाबाबत माहिती मिळालेली नव्हती, ते नागरिक खेड्यापाड्यांतून बसस्थानकात येत होते; पण या ठिकाणी एसटीच्या कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे, असे ज्यावेळी त्यांना समजत असे, त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहत नव्हती, असे भयानक चित्र बसस्थानकांवर होते.

Back to top button