मुंबई महापालिकेत 9 नगरसेवक वाढणार | पुढारी

मुंबई महापालिकेत 9 नगरसेवक वाढणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत दहा वर्षांत वाढलेल्या लोकसंख्येमुळे नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या 9 ने वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. त्यानुसार आता मुंबई महापालिकेत नगरसेवकांची संख्या 227 वरून 236 होणार आहे. दरम्यान, नगरसेवकांची संख्या वाढविल्याने वॉर्डांची फेररचना करावी लागणार आहे. गेल्या महिन्यात मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपरिषदांमधील नगरसेवक संख्येमध्ये 17 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. या बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार सध्या महापालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. ही संख्या 2001 च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे. 2011 च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही.

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार 2001 ते 2011 या दशकात बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये 3.87 टक्के इतकी वाढ झाली आहे.

लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण याबाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पश्चिम उपनगरांत प्रभाग वाढण्याची शक्यता

मुंबई : राजेश सावंत

मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2011 च्या जनगणनेनुसार घेण्यात येणार आहे. एवढेच नाही तर, आतापर्यंत प्रभाग फेररचनेचा आराखडाही तयार झालेला नाही. तरीही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या 9 ने वाढवण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रभाग वाढीमागे शिवसेना असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

प्रभाग संख्या 9 ने वाढवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. याचा अर्थ 227 प्रभागांची फाळणी झाली हे निश्चित आहे. शहर व पूर्व उपनगरांपेक्षा पश्चिम उपनगरांतील प्रभागांतील मतदार संख्या जास्त आहे. पश्चिम उपनगरात एका प्रभागांमध्ये 52 हजार ते 55 हजार मतदार आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरातील प्रभागांची संख्या 6 ते 7 वाढू शकते. तर पूर्व उपनगरात प्रभागात संख्या दोनने वाढण्याची शक्यता आहे.

2011 च्या जनगणनेचा आधार घेत मुंबई महापालिकेच्या 2012 व 2017 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. मात्र त्यावेळी मुंबईतील 227 प्रभागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. मात्र दहा वर्षात मुंबईची लोकसंख्या किती प्रमाणात वाढली, याची जनगणना अद्यापपर्यंत झालेली नाही.

त्यामुळे लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग संख्या वाढवणे तांत्रिकदृष्टया शक्य नसल्याचे पालिकेतील निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. प्रभात फेररचनेचा कच्चा आराखडा अलीकडे राज्य निवडणूक आयोगाला पालिकेने सादर केला आहे. या आराखड्यावर अजून हरकती सूचना मागवण्यात येणार आहेत.

त्यानंतर तो आराखडा अंतिम करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबईतील प्रभागाची संख्या कोणत्या आधारावर वाढविण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग संख्या वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मग 2012 व 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग संख्या का वाढवण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नगरसेवकांच्या मानधनाचा खर्च वाढणार !

मुंबई महापालिकेत प्रत्येक नगरसेवकाला दर महिना 25 हजार रुपये मानधन देण्यात येते. त्याशिवाय मुंबई महापालिका सभागृहात उपस्थित राहणार्‍या प्रत्येक नगरसेवकाला 250 रुपये मानधन मिळते. त्यामुळे प्रत्येक महिना सरासरी 62 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. यात 9 नगरसेवकांची वाढ झाल्यानंतर सरसरीत तीन लाख रुपयांचा खर्च वाढणार आहे.

1963 मध्ये एक सदस्यीय मतदार संघाची स्थापना

मुंबई महानगरपालिकेमध्ये 1963 मध्ये एक सदस्यीय मतदार संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी 140 प्रभागावामध्ये निवडणुका घेण्यात आल्या. त्यानुसार 140 नगरसेवक मुंबई महापालिकेवर निवडून गेले.

Back to top button