Sassoon drug Case : ससूनने कैद्यांचा अहवाल दडपला ! | पुढारी

Sassoon drug Case : ससूनने कैद्यांचा अहवाल दडपला !

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर कोट्यवधी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. त्यानंतर ड्रग्ज तस्कर ललित पाटील पसार झाला. या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयातील कैद्यांच्या कक्षातील कैद्यांबाबतचा अहवाल विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागविला होता. मात्र, ससून रुग्णालय प्रशासनाने हा अहवाल न देता तो दडपल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून रुग्णालयाला 6 ऑक्टोबर रोजी भेट दिली. आरोग्य सेवा, मनुष्यबळ, औषधपुरवठा आदींच्या अनुषंगाने आणि ललित पाटील या कैद्याने पलायन केल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील कैद्यांच्या कक्षांचा आढावा, असे एकूण दोन अहवाल देण्याचे आदेश विभागीय आयुक्त राव यांनी ससून प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार 7 ऑक्टोबरला ससून रुग्णालयातील आरोग्य सेवा, मनुष्यबळ, औषधेपुरवठा याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला. मात्र, कैद्यांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त राव यांना दूरध्वनीवरून तोंडी माहिती देण्यात आली. ससूनमधील कैद्यांच्या कक्षात किती कैदी आहेत, कधीपासून दाखल आहेत, त्यांना कोणकोणते आजार असून, संबंधितांची पुन्हा कारागृहात कधी रवानगी केली किंवा करणार, याबाबत राज्य सरकारने माहिती मागविली नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. दरम्यान, ससूनमधील दाखल कैद्यांबाबतचा लेखी अहवाल अद्याप विभागीय आयुक्तालयाला प्राप्त झालेला नसल्याचे विभागीय आयुक्तालयातील महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

हेही वाचा

‘पुढारी’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भूमिका पुराव्यानिशी : खा. उदयनराजे

Nashik News : विद्यानगर येथे घरफोडी, रोख रकमेसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला

Pune Pmc News : महापालिका अधिकार्‍यांमध्ये कचर्‍यासाठी रस्सीखेच

Back to top button