Lalit Patil Drug Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण : आजार शोधण्यासाठी ससूनचीच ‘पाटील’की! | पुढारी

Lalit Patil Drug Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण : आजार शोधण्यासाठी ससूनचीच 'पाटील'की!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटीलवर सुरुवातीला एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. नंतर अस्थिरोग असल्याचे निदान करण्यात आले. त्याची हर्नियाची शस्त्रक्रिया करण्याचाही विचार पुढे आला होता. अखेरीस त्याचे स्थूलत्व पाहून बेरिएट्रिक सर्जरी करण्याचे निश्चित झाले. विशेष म्हणजे ससूनचे अधिष्ठाताच बेरिएट्रिक सर्जन आहेत. यावरून एनकेन प्रकरेण या ड्रग माफियाला ससूनमध्ये भरती करण्यासाठी डॉक्टरांनी कल्पनाशक्ती पणाला लावल्याचे दिसून येत आहे.

दै. ‘पुढारी’ला मिळालेल्या माहितीनुसार, ललित पाटीलची 3 ऑक्टोबरला हर्नियाची शस्त्रक्रिया केली जाणार होती. पाटील जून महिन्यात ससून रुग्णालयात दाखल होण्यासाठी आला. त्याला प्रवेश ‘द्यायचाच’ असल्याने आधी सर्जरी विभाग आणि नंतर अस्थिरोग विभागातून दाखल करून घेण्याचा आटापिटा ससून रुग्णालयात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

पाटील गेल्या तीन वर्षांपैकी 16 महिने ससून रुग्णालयात आरामात राहत होता. जून महिन्यात त्याला अ‍ॅडमिट करून घेण्यासाठी ससून प्रशासनाला ‘वरून’ फोन आला. प्रत्यक्षात पाटीलला अ‍ॅडमिट करून घेण्याइतक्या उपचारांची गरजच नव्हती, असे आता डॉक्टरांकडून खासगीत सांगितले जात आहे. ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये कारागृहातून आलेल्या कैदी रुग्णांना दाखल करून घेतले जाते. ललित पाटील जून महिन्यापासून तिथे राहत होता. त्याच्यावर सहा डॉक्टरांची टीम उपचार करत होती.

पाटील स्थूल असल्याने त्याची बेरिएट्रिक सर्जरीही केली जाणार असल्याचे समोर आले. पाटीलचे आधी हर्निया, मग बेरिएट्रिक सर्जरी असे ‘मेडिकल रेकॉर्ड’ सांगितले गेले. शस्त्रक्रियेच्या आधी त्याची फिटनेस टेस्ट केली जाणार होती आणि म्हणून एक्स-रे करण्यासाठी त्याला नेले जात होते, अशीही बाजू मांडण्यात आली. प्रत्यक्षात, त्याला सुरुवातीला अस्थिरोग विभागातून दाखल करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे त्याला नेमका कोणता आजार होता, की तो केवळ ‘दाखवण्यापुरता’ समोर आणला गेला, याबाबत गूढ निर्माण झाले आहे.

पाटील ससूनमध्ये आला कसा ?

जूनमध्ये ललित पाटीलला आधी सर्जरी विभागात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून अ‍ॅडमिट करण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर अस्थिरोग विभागातील डॉक्टरांकडे त्याला नेण्यात आले आणि त्यांच्याकरवी दाखल करून घेण्याची शिफारस झाली.

पाटीलवर विशेष उपचार नाहीत

पाटील पळून जाईपर्यंत त्याच्यावर कोणतेही विशेष उपचार करण्यात आले नव्हते. केवळ डॉक्टर राऊंडवर आल्यावर तपासायचे, आणखी एखाद्या डॉक्टरचे मत घ्यावे लागेल, असे सांगायचे आणि निघून जायचे. वॉर्ड क्रमांक 16 मध्ये तो निवांतपणा उपभोगत ड्रग रॅकेट चालवत होता. त्याची तपासणी करण्यासाठी राऊंडवर येणा-या एकाही डॉक्टरला त्याच्यावर ठोस उपचार होत नसल्याची शंका आली नाही का, त्यांनी आपल्या वरिष्ठांना कळवले नाही का, असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

हेही वाचा

Pune Railway News : सणासुदीच्या काळात रेल्वेच्या विशेष फेर्‍या; पुण्यातून 28 फेर्‍या होणार

Nashik Drugs Case : ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्र्यांसह पोलिसांचाही सहभाग : संजय राऊत

Nashik Drug Case : ड्रग्ज प्रकरणामुळे नाचक्की; नाशिकरोडच्या पोलिस निरीक्षकांची बदली?

Back to top button