Pune Navratri 2023 : पुण्यातील देवीच्या मंदिरांमध्ये विधिवत होणार घटस्थापना | पुढारी

Pune Navratri 2023 : पुण्यातील देवीच्या मंदिरांमध्ये विधिवत होणार घटस्थापना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फुलांची आकर्षक सजावटीसह विद्युतरोषणाई…रंगबिरंगी पताक्यांची सजावट आणि दिवसभर भजन-कीर्तनाचे कार्यक्रम…अशा चैतन्यपूर्ण आणि आनंदी वातावरणात रविवारी (दि.15) नवरात्रौत्सवाला शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये सुरुवात होणार आहे. सकाळी मंदिरांमध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होईल आणि त्यानंतर दिवसभर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. भाविकांना दर्शनासाठी मंदिरे दिवसभर खुले राहणार आहे.

शारदीय नवरात्रौत्सवाचा उत्साह देवीच्या मंदिरांमध्ये पाहायला मिळत आहे. पदाधिकारी आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत सकाळी घटस्थापना होणार आहे, आकर्षक पुष्प सजावट, सनई-चौघड्याचे मंजूळ स्वर आणि प्रवेशद्वारावर नक्षीदार रांगोळी….असे प्रफुल्लित करणारे वातावरण मंदिरांमध्ये पाहायला मिळणार असून, भजन मंडळांच्या भजनाने वातावरण भक्तिमय होणार आहे. सायंकाळी काही ठिकाणी मिरवणुकाही निघणार आहेत. भाविकांना महाप्रसादाचा लाभही घेता येणार आहे आणि नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. उत्साहात, आनंदात नवरात्रौत्सव आरंभ होईल.

चतृ:शृंगी देवी मंदिर देवस्थान

रविवारी (दि.15) सकाळी साडेनऊ वाजता पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार आहे. मंदिराचे विश्वस्त व्यवस्थापक डॉ. गंगाधर अनगळ हे यंदाच्या नवरात्रौत्सवाचे सालकरी असून, त्यांच्या हस्ते अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करून घटस्थापना होईल. यंदाच्या नवरात्रौत्सवासाठी देवीला नवी चांदीची आयुधे करण्यात आली आहेत. सकाळी घटस्थापना झाल्यावर ही आयुधे देवीला परिधान करण्यात येणार आहेत. विजयादशमीपर्यंत रोज सकाळी दहा वाजता आणि रात्री नऊ वाजता आरती होणार आहे. तर, गणपती मंदिरामध्ये रोज भजन, कीर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसुक्त पठण, वेदपठण असे धार्मिक कार्यक्रम होतील.

ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिर

मंदिरामध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने रविवारी सकाळी सहा वाजता घटस्थापना होणार आहे. मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी दिवसभर खुले राहणार आहे. मंदिरामध्ये नवरात्रौत्सवानिमित्त खास सजावटही करण्यात आली आहे.

श्री महालक्ष्मी मंदिर (सारसबागेसमोर)

मंदिर ट्रस्टतर्फे यंदा नवरात्रौत्सवात दहाही दिवस धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच, मंदिर परिसरात खास विद्युतरोषणाईही करण्यात आली आहे. रविवारी (दि.15) सकाळी साडेआठ वाजता उद्योजक गोविंद चितळे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी साडेसहा वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय दहा दिवसांत श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रमदेखील मंदिरामध्ये होणार आहेत.

पिवळी जोगेश्वरी मंदिर (शुक्रवार पेठ)

रविवारी सकाळी नऊ वाजता विधिवत पद्धतीने घटस्थापना होणार आहे. सायंकाळी चारनंतर भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. मंदिर दर्शनासाठी सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत खुले राहणार आहे. मंदिरात उत्सवानिमित्त फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि उत्सव मंडपाचीही उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय विद्युतरोषणाईने मंदिर उजळले आहे, अशी मंदिराचे दिनेश कुलकर्णी यांनी सांगितले.

श्री भवानीदेवी मंदिर (भवानी पेठ)

रविवारी (दि.15) पारंपरिक आणि विधिवत पद्धतीने घटस्थापना होणार आहे. सकाळी सहा ते नऊ महारुद्राभिषेक महापूजा, नऊ वाजता तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन होणार आहे, तर सकाळी अकरा वाजता घटस्थापना होईल. दुपारी अडीच ते सायंकाळी चार यावेळेत श्रद्धा भजन मंडळाचा कार्यक्रम, तर सायंकाळी चार वाजता स्वामी शरणाम भजन मंडळाचा कार्यक्रम रंगणार आहे. तर आर्ट ऑफ लिव्हिंगचे सत्संग हे सायंकाळी साडेपाच ते रात्री सात या वेळेत असेल, तर तन्मयी मेहेंदळे यांचे कीर्तन होणार आहे. उत्सवात रोज भजन-कीर्तनाचे कार्यक्रम, भक्तिगीतांचे कार्यक्रम, प्रवचन असे विविध आयोजित करण्यात आले आहेत.

तळजाई माता देवस्थान (तळजाई टेकडी, सहकारनगर)

सकाळी दहा वाजता विजय थोरात यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रौत्सवात दहाही दिवस धार्मिक कार्यक्रम असणार आहेत. भजन मंडळांचे भजन – कीर्तनाचे कार्यक्रम असतील. मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले राहील, असे देवस्थानचे अण्णा थोरात यांनी सांगितले.

वनदेवी मंदिर (कर्वेनगर)

रविवारी दुपारी साडेबारा वाजता विधिवत पद्धतीने घटस्थापना होणार आहे. वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमही होतील. भाविकांना मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले राहील. रोज सायंकाळी मंदिरात आरती होणार असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजता देवीची मिरवणूक निघणार आहे. यामध्ये घोडे, उंट, बँड पथकांचा सहभाग असेल तसेच, याशिवाय भजन-कीर्तनाचे कार्यक्रमांसह पूजा, होमहवनही असणार आहे.

श्री काळी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ)

रविवारी सकाळी आठ वाजता पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार आहे. दिवसभर भजन-कीर्तन, जोगवा असे कार्यक्रम होतीलच. त्याशिवाय सनई-चौघड्याचे वादनही होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले राहील, अशी माहिती वहिवाटदार-पुजारी वदन भिडे यांनी दिली.

हेही वाचा

Navratri 2023 : घटस्थापना करा दुपारी दोनपर्यंत; दाते पंचागाचे मोहन दाते यांची माहिती

छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन

दुर्दशा सर्व्हन्टस सोसायटीची! जमिनीचा मामला, विश्वस्तांचा आपसात हमला..

Back to top button