Pune Drug News : ड्रग्ज विक्रीतून कोट्यवधींचे सोने खरेदी | पुढारी

Pune Drug News : ड्रग्ज विक्रीतून कोट्यवधींचे सोने खरेदी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग्जमाफिया ललित आणि भूषण पाटील यांनी ड्रग्ज विक्रीतून आलेल्या पैशातून मोठ्याप्रमाणात सोने खरेदी करून ठेवल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या हाती तीन किलोहून अधिक सोने लागले आहे. त्या सोन्याची किंमत पावणेदोन कोटी आहे. भूषण आणि अभिषेक या दोघांना अटक केल्यानंतर, चौकशीदरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथून पोलिसांनी हे सोने जप्त केले आहे. दरम्यान, कोर्टात पोलिसांनी संशय व्यक्त करताना ड्रगच्या आलेल्या पैशातून त्यांनी स्थावर मालमत्ता खरेदी केली असल्याचे म्हटले होते. एका दिवसातच पोलिसांच्या हाती अवैध मार्गातून मिळविलेल्या पैशातून पाटील बंधूंनी मोठ्याप्रमावर सोने खरेदी केल्याचे आता समोर आले आहे.

भूषण आणि अभिषेक या दोघांना बुधवारी कोर्टात हजर केल्यानंतर पोलिस कोठडी घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडे तपास सुरू केला आहे. त्यानुसार एकट्या अभिषेक बलकवडे याला घेऊन पोलिसांचे पथक बुधवारी रात्रीच नाशिक येथे रवाना झाले होते. अभिषेक याला हे सोने कोठे ठेवले आहे याची माहिती होती.

ललित आणि भूषणसोबत अभिषेकदेखील ड्रग निर्मिती करून विक्री करण्याच्या रॅकेटमध्ये सहभागी होता. तो भूषण याचा मित्र असून, पेशाने अभियंता आहे. त्यांच्यासोबत काम करत असल्यामुळे या दोघांच्या अमलीपदार्थ निर्मिती आणि विक्रीची त्याला माहिती होती. अनेकदा त्यातून आलेले पैसे तो हाताळत होता.

फार्म्युला विक्रीच्या होते तयारीत

ललित पाटील हा ड्रग विक्रीचे नेटवर्क सांभाळत होता, तर भूषण हा केमिकल अभियंता असल्यामुळे त्याला मेफेड्रोन तयार करण्याचा फॉर्म्युला माहीत होता. ड्रग विक्रीबरोबरच ललित मेफेड्रोन तयार करण्याचा फॉर्म्युला विक्री करण्याच्या तयारीत होता. मोठी रक्कम घेऊन तो मुंबईच्या काही लोकांना प्रशिक्षणदेखील देणार होता. अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा

पेपर कपमध्ये चहा-कॉफी पित असाल तर सावधान!

Pune Navratri 2023 : मंडप उभारणी, विद्युत रोषणाई अन् फुलांची सजावट

Nashik Citylink Bus : सिटीलिंकवर पुन्हा संपाचे सावट

Back to top button