Concept Car : चंद्रावर धावू शकेल ‘कन्सेप्ट कार’! | पुढारी

Concept Car : चंद्रावर धावू शकेल ‘कन्सेप्ट कार’!

मेक्सिको : चंद्राच्या पटलावर भविष्यात कार दिसून येणे हे तूर्तास तरी स्वप्नवत ठरू शकते. पण, कार तयार करणार्‍या टोयोटा कंपनीने बेबी लूनार क्रूझर ही कन्सेप्ट कार सादर केली आहे. सध्या ही केवळ कन्सेप्ट कार म्हणजे कल्पनेपुरती मर्यादित कार आहे. मात्र, भविष्यात चंद्रावर एखादे वाहन उतरायचे असेल तर त्याचे मॉडेल कसे असेल, याची एक झलक या कारच्या माध्यमातून दिसून येईल.

ही कन्सेप्ट कार एक इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल, ज्यात रियालिटी डिस्प्ले, एअरलेस टायर आणि जॉयस्टीक कंट्रोलसारखे अनेक फिचर्स असणार आहेत. तसे पाहता, मनुष्याने चंद्रावर पाय ठेवून पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र, मागील 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून पुन्हा एकदा मनुष्याला चंद्रावर पाठवण्याची तयारी सुरू आहे. अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ यासाठी अव्याहतपणे कार्यरत आहे. आर्टेमिस या मोहिमेंतर्गत चंद्रावर महिला व पुरुष अंतराळवीराला रवाना करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 2030 च्या दशकात मून बेस स्थापन करण्याचा त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.

या पार्श्वभूमीवर तेथे एखादे वाहन असेल तर कशा स्वरुपाचे असेल, याचे मॉडेल या निमित्ताने प्रत्यक्षात साकारले गेले आहे. पृथ्वीवरील कारप्रमाणे या कन्सेप्ट कारमध्ये पॅनॉरमिक व्ह्यू, डॅशबोर्ट डिस्प्ले, कॅमेरा, सेंसर आहेत. शिवाय, टायरही एअरलेस आहेत. याचे डिझाईन एफजे 40 लँड क्रूझ, जपानची कार कंपनी आणि जाक्साच्या संयुक्त माध्यमातून केले गेले. सध्या सहा चाकांचे सेल्फ डिविन रोव्हर 2029 मध्ये चंद्रावर उतरवले जाणार आहे आणि ते 10 हजार किमी प्रवासासाठी सक्षम असेल, असा दावा आहे.

आरव्हीसारख्या इलेक्ट्रिक कारमध्ये दोघेजण 14 दिवस राहू शकतील आणि संशोधनही करू शकतील. या पार्श्वभूमीवर, भविष्यातील चंद्रावरील कन्सेप्ट कार कशी असेल, याची छोटी झलक या मॉडेलमधून झळकली आहे.

Back to top button