अज्ञातांनी विद्यार्थ्यांच्या अंगावर ‘स्प्रे’ मारल्याने भीतीचे वातावरण

अज्ञातांनी विद्यार्थ्यांच्या अंगावर ‘स्प्रे’ मारल्याने भीतीचे वातावरण

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीतील गायमुख ते भोरवाडी रस्त्यावर आठवडेभरात दोन वेळा शाळकरी विद्यार्थ्यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तींनी स्प्रे मारल्याच्या घटना घडल्या. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत विद्यार्थी व पालकांना धीर देत कोणी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास मंचर पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. अवसरी येथील श्री भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही घटना घडली आहे.

संबंधित बातम्या :

शनिवारी (दि. 7) वेदांत सचिन भोर (वय 11) हा इयत्ता 5 वीतील मुलगा शाळेत जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी मुलाच्या हातावर स्प्रे मारला आणि ते निघून गेले. बुधवारी (दि. 11) प्रणाली अजय तांबडे (वय 14) ही इयत्ता 8 वीतील विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीबरोबर शाळेत येत असताना दोन दुचाकींवर आलेल्या चार जणांपैकी एका दुचाकीवरील व्यक्तीने तिच्या तोंडावर स्प्रे मारला. त्या वेळी तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणीने आरडाओरडा केला असता, ते दुचाकीस्वार निघून गेले. हा स्प्रे मारल्यानंतर शरीराला खाज येऊन सूज येण्याचे प्रकार घडत असल्याचे विद्यार्थ्यांचे पालक सांगत आहेत.

दुचाकीवरून आलेल्या व्यक्ती कोठून येतात किंवा कशासाठी हा प्रकार करत आहेत, याबाबतची अद्यापही कुठलीही खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही मात्र आठ दिवसांत दोन वेळा घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत श्री भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य डी. डी. जाधव यांनी मंचर पोलिस ठाण्यात माहिती दिली असून, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस जवान नंदकुमार आढारी, अविनाश दळवी, शेखर भोईर यांनी घटनास्थळी भेट देत विकास भोर यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करत पाहणी केली आहे.

एकजुटीने शाळेत जा
विद्यार्थ्यांच्या अंगावर स्प्रे मारणार्‍या व्यक्तींचा उद्देश समजला नसून अवसरी येथे शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांनी एकजुटीने शाळेत जावे. रस्त्यावर, घराच्या आजूबाजूला कोणतीही अनोळखी व्यक्ती दिसल्यास पालकांना, पोलिस पाटील, मंचर पोलिस यांना कळवावे. शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात. शक्य असल्यास पुढील काही दिवस पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे, असे आवाहन मंचर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news