World Cup Match : पुणेकरांसाठी खुशखबर! विश्वचषक सामन्यासाठी पीएमपीची बससेवा

World Cup Match : पुणेकरांसाठी खुशखबर! विश्वचषक सामन्यासाठी पीएमपीची बससेवा

पुणे : गहुंजे स्टेडियम येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यासाठी पीएमपीकडून विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे मनपा भवन, कात्रज आणि निगडी येथील टिळक चौक बसस्थानकातून ही सेवा उपलब्ध होणार आहे, क्रिक्रेटप्रेमींना या बसद्वारे गहुंजे स्टेडियमला सामने पहाण्यासाठी जाणे सोपे होणार आहे. क्रिकेटचा विश्वचषक म्हटल्यावर पुण्यासह राज्यभरातून क्रिकेटप्रेमी पुण्यात हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या क्रिकेटच्या प्रेक्षकांना स्टेडियमपर्यंत तत्काळ वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पीएमपीकडून विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.

गहुंजे स्टेडियमवर एकूण 5 सामने असून, यामध्ये भारत आणि बांगलादेश हा सामना 19 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानुसार पीएमपीकडून पुणे मनपा भवन, कात्रज बायपास बसस्थानक व निगडी टिळक चौक बसस्थानक या तीन ठिकाणांहून बस सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. क्रिकेटप्रेमींची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार तीनही बस स्थानकांवरून जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात येईल, या बसकरिता जाण्यासाठी 100 आणि येण्यासाठी 100 रुपये तिकीट आकारले जाईल, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.

तिकिट दर 100 रुपये

19 आणि 30 ऑक्टोबर तर 1, 8 आणि 11 नोव्हेंबरला पुण्यात सामने होणार आहे. त्यानुसार पुणे मनपा भवन येथून सकाळी 11, 11.35 आणि दुपारी 12.5 वाजता बस सुटेल. तर 11 नोव्हेंबरला सकाळी 8.25, 8.50 आणि 9.05 वाजता बस सुटेल. कात्रज बायपास स्थानकावरून सकाळी 11 आणि 11.30 वाजता तर 11 नोव्हेंबरला सकाळी 8.15 आणि 8.35 ला बस सुटेल. या दोन्ही मार्गासाठी जाताना व येताना प्रत्येकी व्यक्तीसाठी 100 रुपये तिकिट दर आहे. तर निगडी टिळक चौक स्थानकावरून चारही दिवस दुपारी 12 आणि साडेबारा तर 11 नोव्हेंबरला 8.30 आणि 9 बाजता बस सुटेल. त्यासाठी प्रत्येकी 50 रुपये तिकिट दर आहे. असेही पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news