‘त्या’ ठेकेदारावर फौजदारी कारवाई करणार
पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावामध्ये मंगळवारी (दि.10) सकाळी क्लोरीन गॅसची गळती झाली. त्यामुळे 19 नागरिकांना त्रास झाला. त्यांना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. तर तिघांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या जलतरण तलावाच्या देखभालीचे काम करणार्या खासगी संस्थेकडून खुलासा घेतला आहे. त्या ठेकेदार संस्थेवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
जलतरण तलावातील पाणी शुद्धीकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई, देखभाल व यांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम चिंचवड येथील सुमित स्पोर्ट्स अॅण्ड फिटनेस इक्विपमेंटसकडे आहे. तलावातील क्लोरीन गॅस गळती होऊन दुर्घटना घडल्याने ठेकेदार संस्थेला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याबाबत आयुक्त सिंह म्हणाले की, ठेकेदार संस्थेची चौकशी करण्यात आली आहे. त्यांना नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला आहे. तो समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. प्रसंगी त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा विचार सुरू आहे. तसेच क्रीडा विभागातील जबाबदार अधिकारी, पर्यवेक्षक व कर्मचारी यांचीही चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, जखमी झालेल्या 17 जणांना वायसीएममध्ये दाखल केले आहे. तर, दोन जणांना लाइफलाइन रुग्णालयात दाखल केले आहे. श्वसन, खोकला व इतर त्रास कमी झाला असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतरही एक आठवडा महापालिकेचे डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहेत. तलावाच्या परिसरातील कोणाला त्रास झाल्यास तात्काळ वायसीएम रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
सर्व तलाव काही दिवस बंद ठेवणार
महापालिकेचे एकूण 13 जलतरण तलाव असून, त्यापैकी सध्या 8 सुरू आहेत. सर्व तलावांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यातील त्रुटी शोधून त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. तोपर्यंत सर्व तलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. पर्यायी व्यवस्थेचा विचार सुरू आहे, असे आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा

